

वडगाव मावळ: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या रिंगरोड प्रकल्पाचे काम अत्यंत जलद गतीने सुरू असून, या प्रकल्पाचा प्रमुख भाग असलेले वडगाव मावळ येथील महामार्गावर उड्डाणपूल व उर्से खिंडीतील बोगद्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसते.
पुणे ,पिंपरी चिंचवड या महानगरांना वळसा घालणारा रिंगरोड मावळ तालुक्यातील चांदखेड, परंदवडी, उर्से, वडगाव मावळ, कातवी, नानोलीतर्फे चाकण, आकुर्डी, आंबी, सुदुंबरे, सुदवडी या गावांमधून जातो. संबंधित गावांमध्ये संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामही जलदगतीने सुरू आहे.
यामध्ये प्रामुख्याने वडगाव मावळ व उर्से गावच्या हद्दीत एक बोगदा असून, दोन्ही बाजूंनी या बोगद्याचे काम सुरू आहे. वडगाव मावळ बाजूने बोगद्याच्या प्रवेशद्वाराचे काम झाले असून आतमध्ये अत्याधुनिक मशिनद्वारे होल मारून, ब्लास्टिंग करून बोगदा तयार करण्यात येणार आहे. दुसरीकडे उर्से बाजूने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. हा बोगदा वडगाव फाटा ते उर्से गावाला जोडणाऱ्या उर्से खिंडीतील रस्त्याखालून जात आहे.
वडगाव, कातवी भागातून हा रिंगरोड एमआयडीसी रस्त्यालगत जात असून, वडगाव येथे मुंबई पुणे महामार्गावर उड्डाणपुलाने पलीकडे जाणार आहे. याभागात खोदकाम, पिलर उभे करण्याचे काम सुरू आहे.
पुढे विशेषतः इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी या भागामध्ये मात्र काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, वडगाव मावळ येथे उर्से खिंडीखालून जाणारा बोगदा, मुंबई पुणे महामार्ग येथे उड्डाण पूल, वडगाव शहराचे प्रवेशद्वार ते वडगाव फाटा या भागात रिंगरोड, एमआयडीसी रोड, तळेगाव - चाकण रस्ता या रस्त्याच्या जाळ्यांमुळे चित्रच बदलून जाणार असल्याचे दिसते.