X-Ray Machine Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC X-Ray Machine Tender: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एक्स-रे मशिन खरेदीवर प्रश्नचिन्ह; १.४० कोटींचे मशिन २.७७ कोटींना?

निविदा रद्द करून चौकशीची नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी; तांत्रिक अटी ठराविक कंपन्यांना अनुकूल असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून एक कोटी 40 लाख रुपये किमतीचे एक्स-रे मशिन तब्बल 2 कोटी 77 लाख रुपयास खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. ती निविदाप्रक्रिया रद्द करुन, महापालिकेचे नुकसान थांबवावे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

नगरसेवक वाघेरे यांनी सांगितले की, महापालिकेच्या वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी काढण्यात आलेल्या एक्स रे मशिन खरेदीच्या निविदेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मशिनसाठी महापालिकेने तब्बल 2 कोटी 77 लाख 56 हजार रुपयांचे अंदाजपत्रकीय मूल्य निश्चित केले आहे. बाजारातील तसेच, इतर शासकीय संस्थांमधील खरेदी दरांच्या तुलनेत ही रक्कम मोठी आहे.

निविदेतील तांत्रिक स्पेसिफिकेशनशी संबंधित मूळ उत्पादक कंपनीने राजस्थानमधील कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला 1000 एकए क्षमतेचे याच प्रकारचे मशीन सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांना पुरविले आहे. तसेच 800 एमए क्षमतेचे मशिन याच वर्षी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांना विकण्यात आले आहे.

एकीकडे 1000 एमए मशिनची शासकीय संस्थेतील खरेदी सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांत करण्यात आली असताना, महापालिकेच्या निविदेत त्याच क्षमतेच्या मशीनसाठी 2 कोटी 77 लाख 56 हजार रुपये इतके मूल्य निश्चित करण्यात आल्याने दरातील मोठ्या फरकाबाबत वाघेरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या निविदेतील तांत्रिक अटी व स्पेसिफिकेशन काही ठराविक कंपन्या व पुरवठादारांना अनुकूल ठरतील, अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे निविदेतील प्रत्येक तांत्रिक निकष, अंदाजपत्रकीय दर व त्यासाठी वापरण्यात आलेला बाजारभाव यांची तपासणी करण्यात यावी. संबंधित उत्पादक कंपनीच्या काही सरकारी संस्थांमधील विक्री व्यवहारांबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एक्स रे मशिनची खरेदी प्रक्रिया रद्द करून नव्याने राबवण्यात यावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT