Water Wastage Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Water Wastage: दुभाजकांवरील झाडांना पाणी देताना हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

टँकरमधून अनियंत्रित पाणी सोडल्याने अपघाताचा धोका; पिंपरी-चिंचवड पालिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: शहरातील रस्ता दुभाजकांत लावण्यात आलेल्या झाडांना उन्हाच्या तडाख्यापासून वाचविण्यासाठी पाणी सोडले जाते; मात्र, पाणी सोडताना त्यांच्या मुळांवरच आघात केला जातोय. महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरच महामार्गावर टँकरमधून पाण्याचा अक्षरशः मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरात एका बाजूला पाणीटंचाई, तर दुसऱ्या बाजूला हजारो लिटर पाणी वाया घालविण्याचा प्रकार प्रशासनाच्या नजरेसमोरच घडतोय. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागास खरेचच झाडांना जगवायचे आहे की, केवळ पाणी देण्याचा दिखावा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुचाकीस्वारांची सुरक्षितता धोक्यात

कर्मचारी टँकरवर बसून पाणी सोडतात. त्यामुळे झाडांची माती महामार्गावर पसरते व तेथे चिखल निर्माण होऊन दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

ग्राऊंड रिपोर्ट:

शहरातील अनेक रस्ते दुभाजकात लावलेल्या झाडांना टँकरमधून अनियंत्रित वेगाने पाणी सोडले जाते. पाण्याच्या जोरामुळे मुळांची माती सैल होऊन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारामुळे वृक्ष संवर्धनाऐवजी नुकसानच अधिक होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.

दररोजचा पाण्याचा अपव्यय:

  • अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्रभागासाठी गरजेनुसार दररोज किमान 2 टँकर वापरले जातात.

  • एकूण 8 प्रभाग = 16 टँकर प्रतिदिन

  • एका टँकरची क्षमता : 8000 लिटर

  • साधारणतः प्रति टँकर वाया जाणारे पाणी : 200 ते 250 लिटर

  • दररोजचा पाण्याचा अपव्यय : 3200 ते 4000 लिटर

  • दररोज: 3200 ते 4000 लिटर

  • महिन्याकाठी पाण्याच अपव्यय 96,000 ते 1,20,000लिटर

उपाययोजना काय ?

  • टँकरमधून पाणी सोडताना वेग नियंत्रित करणारी यंत्रणा बसवणे

  • ड्रिप इरिगेशन / स्लो वॉटरिंग यंत्रणा बसविणे.

  • प्रशिक्षित कर्मचारी कामावर नेमणे.

  • सार्वजनिक सुरक्षिततेची काळजी

  • पाणी देताना बॅरिकेडिंग, वेळेचे नियोजन आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करणे.

  • नियमित देखरेख व जबाबदारी

  • प्रत्येक प्रभागात अधिकाऱ्यांकडून मॉनिटरिंग आणि जबाबदार व्यक्ती निश्चित करणे

  • पाणी वापराचे ऑडिट ठेवणे.

  • सूचनांचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

मी दररोज या मार्गाने ऑफिसला जातो. अचानक टँकरमधून पाणी वेगाने सोडले की चिखल थेट अंगावर उडतो. अनेक वेळा डोळ्यात माती गेल्यामुळे गाडी चालवताना अडचण होते. रस्ता निसरडा होतो आणि अपघाताचा धोका वाढतो. प्रशासनाने ही पद्धत तत्काळ बदलायला हवी.
मनोज माने आयटी अभियंता
पदपथावरून साचलेल्या पाण्यातून चालताना घसरून पडण्याची शक्यता असते. काही ठिकाणी पाणी थेट अंगावर उडते, त्यामुळे मोठा त्रास होतो. झाडांना पाणी देणं गरजेचं आहे; परंतु योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
मोहित धारवड पादचारी
आम्ही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष खाली उतरून झाडांना पाणी सोडण्यास सांगत आहोत. इतर विभागांसोबत समन्वय साधून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कर्मचारी सुरक्षेबाबत तत्काळ मिटिंग घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी देण्याचे निर्देश दिले आहेत. सूचनांनंतरही चुका केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्षाधिकारी, उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT