Pimpri Water Supply Problem: दापोडी-कासारवाडी-फुगेवाडीत पाणीटंचाई; कमी दाबाने पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण; टँकर व वॉटर एटीएमवर नागरिकांची मदार
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

दापोडी: दिवसाआड कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा आणि यात वीज कपात यामुळे दापोडी, कासारवाडी, फुगेवाडीकर यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Water Supply
Lonavala Indrayani River Water Hyacinth: इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात; पावसाळ्यापूर्वी हालचाल

जारचे दर वाढले

मार्च, एप्रिल, मे महिन्यातील कडाक्याचा उन्हाळा आणि यात अंगाची लाही लाही होत असताना दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी या परिसरात वीज कपात आणि पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाणी अनियमित वेळी आले तर ते कमी दाबाने येते, पाणी मिळाले तर नशीब; नाही तर पाण्यासाठी शोध मोहीम करावी लागते. जारसाठी नागरिकांना जास्त पैसे द्यावे लागत आहेत.

वॉटर एटीएमवर गर्दी

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात या गोंधळाचा सर्वांधिक फटका बसत आहे. घरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसेल तर नागरिकांना एकतर टँकर मागवावा लागतो; अन्यथा वॉटर एटीएममध्ये जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.

Water Supply
Maharashtra HSC Result NEET Exam Stress: बारावी निकालानंतर लगेच नीट; विद्यार्थ्यांवर मानसिक ताण

टँकरवर मदार

महापालिकेच्यावतीने स्थानिक रहिवाशांना पाणीपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आजही या परिसरातील स्थानिक रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती वणवण करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी वॉलचे आणि जारचे पाणी किंवा ज्यादा पैसे देऊन पाण्याचा टँकर घेऊन तहान भागवावी लागत आहे.

नागरिकांमध्ये नाराजी

परिसरातील अनेक टाक्या वेळेत भरल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना स्व:खर्चाने पाणी आणावे लागते. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घेणे किंवा सार्वजनिक वॉटर एटीएमचा आधार घेण्याची वेळ येते. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नोकरदार आणि गृहिणींचे नियोजन कोलमडले आहे. ऐन उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Water Supply
Pimpri Construction Pollution Rules: बांधकाम प्रदूषणावर महापालिकेची कडक कारवाई; १५० हून अधिक बिल्डरांना नोटिसा

फुगेवाडीत कमी दाबाने पाणी

फुगेवाडी परिसरात पाण्याची टंचाई आहे. नेहमीच्या वेळेत पाणी आले असले तरी त्याचा दाब कमी असतो. नेहमीच्या वेळेपेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा झाल्याने गृहिणी, नोकरदारांची मोठी गैरसोय होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढलेली असताना अशा प्रकारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

महावितरणचा शट डाऊन व निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम पूर्ण होत आहे. यंत्रणेत झालेल्या बदलामुळे काही भागात पाण्याचा दाब कमी झाला होता. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच सर्व भागात सुरळीत व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होईल.

साकेत पावरा, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

Water Supply
Pimpri Ramkrishna More Auditorium Irregularities: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील अनियमितता; १० कर्मचाऱ्यांना नोटीस

नियोजित कामानंतरही पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब का होतो? असा प्रश्न निर्माण होत आहे. पाणी वेळेत न आल्यामुळे घरातील कामे रखडली जात आहेत. पाण्याचे जार विकत घ्यावे लागते. प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन कार्यक्षमतेने करणे आवश्यक आहे.

सुनीता अडसुळे, स्त्री जागरण मंच दापोडी

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात असून, भविष्यातील वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने मुळशी धरणातून 760 दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शशिकांत देशपांडे, नागरिक, दापोडी

दापोडी येथील कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नवीन उपसूचनेद्वारे तीन कोटी रुपये बजेट मंजूर करुन घेतले आहे. या नवीन टाकीसाठी जागाही ताब्यात मिळालेली आहे. पुढील महिन्यात टेंडर निघेल व लगेच काम सुरू होईल. सद्यस्थितीत मात्र प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करावा.

संजय काटे, सभापती, शहर सुधारणा समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news