Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Swagatam E Entry: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वागतम ई-प्रवेशाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

साडेचार महिन्यांत 51 हजार 159 नागरिकांची ऑनलाइन नोंदणी; बांधकाम परवानगी विभागाला सर्वाधिक भेटी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात प्रवेश करण्यासाठी प्रशासनाने 1 मे रोजीपासून स्वागतम ई-प्रवेश ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या डिजिटल सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यत साडेचार महिन्यात तब्बल 51 हजार 159 जणांनी नोंदणी केली आहे.

महापालिका भवनातील विविध विभागांमध्ये कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, अनावश्यक प्रतीक्षा टाळता यावी व नागरिकांच्या भेटीची अचूक डिजिटल नोंद उपलब्ध राहावी, या उद्देशाने ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या भेटीची ऑनलाइन नोंदणी करता येते. संबंधित विभागाची निवड करून निश्चित दिवशी महापालिका भवनात प्रवेश घेता येतो.

सर्वाधिक नागरिकांनी भेट दिलेल्या पहिल्या दहा विभागांमध्ये बांधकाम परवानगी विभागास 9 हजार 361, नगर रचना विभागास 4 हजार 311, स्थापत्य विभागास 3 हजार 792, महापौर कार्यालयास 2 हजार 306, वैद्यकीय विभागास 2 हजार 403, आरोग्य विभागास 1 हजार 920, पर्यावरण अभियांत्रिकी विभागास 1 हजार 571, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागास 1 हजार 491, आयुक्त कार्यालयास 1 हजार 330 आणि लेखा विभागास 1 हजार 249 नागरिकांनी भेट दिली आहे.

पास काढणयासाठी नागरिकांनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुख्य इमारत प्रवेश प्रणाली या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथमच नोंदणी करणार्‍या नागरिकांनी आपले लॉगिन अकाऊंट तयार करावे लागते. त्यासाठी पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती भरावी लागते. नोंदणी प्रक्रियेदरम्यान मोबाईल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी केली जाते. महापालिका भवनात प्रत्येक प्रवेशाच्या वेळीही ओटीपी प्रणालीचा वापर करण्यात येतो. नागरिकांना एका भेटीसाठी किमान एक आणि कमाल तीन विभागांची निवड करता येते.

आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून लाभ घ्या

स्वागतम ई-प्रवेश प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना महापालिका भवनात येण्यापूर्वीच आपल्या भेटीची नोंदणी करता येत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच प्रवेश व्यवस्थेत शिस्त, सुरक्षितता व पारदर्शकता निर्माण होत आहे. नागरिकांनी शक्यतो आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT