

पिंपरी: कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती ताब्यात घेत ती सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी 'म्यूल अकाउंट' म्हणून वापरणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
गोव्यातील नागरिकांकडून, विशेषतः महिलांकडून ६० ते ७० बँक खाती मिळवून त्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अभिषेक आचरेकर (३४, रा. गोवा) आणि अनमोल शर्मा (३२, रा. कोलकाता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाला विदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ५०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून ८३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात २१ मार्च रोजी फिर्यादीने ३० लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका खात्यात जमा केल्याचे समोर आले. हे खाते 'शिवशक्ती एंटरप्रायझेस'च्या नावावर असून, आचरेकर आणि प्रतीक्षा नाईक यांच्या भागीदारीतील असल्याचे निष्पन्न झाले.
आचरेकर वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. मात्र, तांत्रिक विश्लेषणातून तो २८ ऑगस्टला पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने खेडशिवापूर येथून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आचरेकर हा साथीदारांच्या मदतीने गोव्यातील नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती मिळवत असल्याचे समोर आले. अशा प्रकारे मिळविलेली ६० ते ७० खाती शर्मा व इतर साथीदारांमार्फत सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात आली.
आचरेकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शर्माचा तांत्रिक माग काढण्यात आला. तो कोलकाता येथे असल्याचे समजल्यानंतर पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. संबंधित संशयित पुणे शहर आणि राजस्थानमधील गुन्ह्यांतही पाहिजे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, निरीक्षक दिगंबर गायकवाड, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, सागर पोमण, रोहित डोळस, विद्या पाटील, दीपक भोसले, विनायक म्हस्कर, हेमंत खरात, सुभाष पाटील, समीर घाडगे, मोहन वरळे, सोपान बोदवाड, अतुल लोखंडे, सूरज शिंदे, भाविका प्रधान, नम्रता कांबळे यांच्या पथकाने केली.
खाते इतरांना वापरण्यास न देण्याचे आवाहन
कर्ज, कमिशन किंवा नोकरीच्या आमिषाला बळी पडून बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, नेट बँकिंग अथवा यूपीआयचा ताबा इतरांना देणे धोकादायक ठरू शकते. अशा खात्याचा सायबर फसवणुकीसाठी वापर झाल्यास खातेधारकही तपासाच्या कक्षेत येऊ शकतो. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे खाते इतरांना वापरण्यास देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे