वर्षा कांबळे
पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमी स्मार्ट सिटी तसेच शाळांबाबतही उत्तम दर्जा असल्याबाबत जाहिरात करते. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेच्याच २२ शाळांना खेळाचे मैदान नसल्याचे 'पुढारी' प्रतिनिधीच्या पाहणीत आढळून आले. महापालिकेच्या १३४ शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी केवळ १२ क्रीडा शिक्षक उपलब्ध आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार २०० विद्यार्थ्यांमागे १ क्रीडा शिक्षक असणे गरजेचे आहे. म्हणजेच, ४५ हजार विद्यार्थ्यांसाठी २२५ क्रीडा शिक्षक हवेत. प्रत्यक्षात फक्त १२ क्रीडा शिक्षक असून, २१३ शिक्षकांचा अभाव आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ११० प्राथमिक आणि २४ माध्यमिक शाळेत गोरगरीब मुले शिक्षण घेत आहेत. महापलिकेचा सर्व शाळा स्मार्ट करण्याकडे कल आहे. त्यासाठी डिजिटल शिक्षण घेत आहेत. मात्र, काही विद्यार्थी हे क्रीडा निपुणदेखील आहेत. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सरावाची गरज आहे. त्यासाठी मैदाने, क्रीडासाहित्य आणि क्रीडाशिक्षकांचा अभाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांची खेळासाठी कुचंबणा होत आहे. स्मार्ट व डिजिटल शिक्षणावर भर देताना मात्र क्रीडा विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही गंभीर बाब आहे.
विद्यार्थ्यांना शारीरिक आणि बौद्धिक विकास हा शाळेतच घडत असतो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेत असतानाच चांगली क्रीडा मैदाने असतील तर त्यांचा सरावही उत्तम होईल. शहरात फक्त खासगी शाळांमध्येच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या २२ शाळांना मैदानच नसल्याने विद्यार्थ्यांनी खेळायचे कसे, असा प्रश्न पडत आहे.
शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातील दोन ते चार तास खेळाचे असतात. यामध्येच विद्यार्थ्यांतील क्रीडागुणांचा विकास होत असतो. विद्यार्थी कोणत्या खेळात निपुण आहे हे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील अवस्थेतच कळण्यात मदत होते. पण याच खेळण्या बागडण्याच्या वयात मैदानाविना विद्यार्थ्यांची खेळाविषयीची गरज आणि आवड कमी होत आहे.
क्रीडा मैदाने झाली पार्किंग झोन
महापालिकेच्या मराठी, उर्दू व हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच ठिकाणी आहेत. या दोन ते तीन शाळांना एकच मैदान वापरले जाते, तर काही शाळांची मैदाने छोटी आहेत. यामध्ये शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी हे चारचाकी गाड्या घेऊन येतात. या गाड्या शाळेतील मैदानावरच पार्क केल्या जातात. त्यामुळे मैदानाची बरीचशी जागा व्यापली जाते. सध्या शाळेची मैदाने ही शिक्षक आणि कर्मचार्यांची पार्किंग झोन झाली आहेत.
इनडोअर गेम्स, संगणक क्लास
शाळेला मैदानच नसल्याने पीटीच्या तासात इनडोअर गेम्स किंवा संगणक क्लास घेण्यात येतात. यामध्ये बुद्धिबळ यासारखे गेम खेळले जातात. तसेच ज्या शाळांना मैदाने आहेत तेथील मुलांना फक्त शनिवारीच क्रीडा साहित्य खेळायला दिले जाते.
क्रीडा शिक्षकांचा अभाव
महापालिका शाळेत असलेल्या क्रीडा शिक्षकांना इतर कामे लावली जातात. तसेच शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती केली नसल्याने त्या कालावधीत मुलांची खेळाविषयीची आवड कमी झाली आहे. सध्या सर्व क्रीडा शिक्षक एसआयआर आणि निवडणुकांच्या कामात असल्याने शाळांमध्ये पीटीचे तासच होत नाहीत.
मैदानासाठी आरक्षित जागा असूनही ताबा नाही
मैदान तपासणीबाबत शिक्षण विभागाने पडताळणी करणे आवश्यक असते. शाळेच्या मालकीचे मैदान नसेल, तर महापालिकेने विकसित केलेल्या क्रीडा मैदानावर घेऊन जाणे आवश्यक असते. महापालिकेकडे मैदानासाठी जागा आरक्षित असूनही ताब्यात घेतली जात नाही. ज्या शाळांना मैदाने नाहीत तेथील विद्यार्थ्यांना मनपाच्या क्रीडा मैदानात घेऊन जायला पाहिजे. पण सध्या शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा मैदानात नेले जात नाही.
क्रीडा प्रबोधिनीमध्येच फक्त खेळाडूंना वाव
मनपाच्या क्रीडा प्रबोधिनीमध्येच फक्त खेळाडू तयार होतात. मात्र, ही शाळा नेहरूनगर याठिकाणी असल्याने इतर ठिकाणांतील खेळाडू विद्यार्थ्यांना याठिकाणी येऊन शिकणे सोयीस्कर होत नाही. तरी देखील याठिकाणी काही विद्यार्थी खेळाच्या आवडीने शिक्षण घेतात. यामध्ये प्रवासात बराचसा वेळ जातो. याबाबत प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
पालिका शाळांतील क्रीडाशिक्षकांना सध्या एसआयआर आणि निवडणुकांचे काम लावण्यात आले आहे. काहींची बढती झाल्याने ते क्रीडा पर्यवेक्षक झाले आहेत. त्यामुळे शाळांवर असे क्रीडाशिक्षक नाहीत. मानधनावर क्रीडाशिक्षक नेमण्याचा विचार सुरू आहे.पंकज पाटील (उपायुक्त, क्रीडा विभाग)