पिंपरी: आर्थिक संकट व आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रकल्प व सल्लागार नियुक्ती करू नका, असा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी काढला होता. त्याकडे स्थायी समितीने दुर्लक्ष करत बुधवारच्या (दि.10) सभेत छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्प सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यास शिवसेनेने (एकनाथ शिंदे) विरोध दर्शविला. मात्र, सत्ताधार्यांकडून तो विषय मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने बोर्हाडेवाडी, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. टप्पा क्रमांक एकमध्ये पुतळ्याचे आवश्यक चौथर्याचे काम करण्यासाठी सुमारे 12 कोटी 47 लाख रुपयांची निविदा मंजूर केली होती. टप्पा दोनमध्ये पुतळा उभारण्यासाठी सुमारे 32 कोटी 84 लाख रुपयांची निविदाही मंजूर करण्यात आली. टप्पा तीनमध्ये पुतळ्याच्या चौथर्याचे उर्वरित काम करणे व परिसर सुशोभिकरणासाठी सुमारे 15 कोटी 11 लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे. आता टप्पा क्रमांक चारनुसार ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य व विद्युतविषयक कामांसाठी 32 कोटी 34 लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे.
आतापर्यंत पुतळ्याच्या एकाच कामासाठी एकूण 92 कोटी 76 लाख रुपये खर्चाच्या वेगवेगळ्या चार निविदा काढण्यात आल्या आहेत. पुतळ्याच्या चौथ्या टप्प्यातील नवीन कामांसाठी प्रकल्प सल्लागार म्हणून क्रिएशन्स इंजिनिअर्सला सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव स्थायी समिती होता. त्यावर टप्पा चारच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाली होती. जुन्याच सल्लागाराला काम दिले जात आहे, हे चुकीचे आहे, असा आरोप स्थायी समिती सभेत शिवसेनेने केला. मात्र, सत्ताधारी भाजपने हा विषय मंजूर केला.
नवीन काम असल्याने नियुक्ती
पालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याचा कामाचे टप्पा तीनपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. आत्ता चौथ्या टप्प्यातील काम करण्यात येत आहे. त्याला कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली.
बेकायदा कारभार लपविण्यासाठी जुन्याच सल्लागारांची नियुक्ती
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामाच्या टप्पा चारच्या निविदा प्रक्रियेवर दोन्ही सभागृहात चर्चा झाली. आक्षेप नोंदविले. मात्र, त्यावर उत्तर आलेले नाही. अद्याप चौकशी केलेली नाही. निविदापूर्व कामांसाठी नियुक्त केलेल्या सल्लागाराने चुकीच्या पध्दतीने प्रकल्पाचे अंदाजपत्रक व निविदा अटी-शर्ती तयार केल्या आहेत. सगळ्या कामासाठी एकच सल्लागार आहे. अंदाजपत्रक तयार करताना केलेला बेकायदेशीर कारभार लपविण्यासाठीच या सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुढील कामांसाठी त्याच सल्लागाराची नेमणूक करणे चुकीचे आहे, असा आरोप सुलभा उबाळे यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.