

पिंपरी: पायाभूत सुविधा विकास, वाहतूककोंडी निर्मूलन आणि प्रशासनातील पारदर्शकता या तीन प्रमुख उद्दिष्टांवर आगामी काळात विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवार (दि. १०) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला.
डॉ. चौधरी म्हणाले की, बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोलाईन 3 अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या मार्गावरील 12 स्थानकांचा पहिला टप्पा जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मार्गाची तांत्रिक आणि सुरक्षा तपासणी 15 ते 20 जूनदरम्यान आयुक्त रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही सेवा 15 जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल.
मेट्रो प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा
तसेच डिसेंबर 2026 पर्यंत माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवेश मिळावा, यासाठी पहिल्या सात स्थानकांपर्यंत प्रशस्त व दर्जेदार पदपथ उभारण्यात येणार आहेत. यामुळे पादचारी सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनधिकृत जाहिरात फलक शोधण्यासाठी एआय आधारित ड्रोन
अनधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्सविरोधात पीएमआरडीएने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. 'एआय' आधारित 'व्हर्च्युअल सर्वेअर मोबाईल कॅप्चर' (व्हीएमएससी) ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून विनापरवाना जाहिरात फलकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. या उपक्रमामुळे महसूल वाढीसह शहरी नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी विविध रस्ते प्रकल्प, इनर रिंगरोड आणि महत्त्वाच्या चौकांमधील सुधारणा यांना गती देण्यात येत आहे. याशिवाय गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी विशेष उपाययोजना, तसेच मान्सूनपूर्व तयारीची कामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कामकाजाच्या गतिमानतेसाठी 'सिंगल विंडो'
प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी 'सिंगल विंडो प्रणाली लागू करण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या या उपक्रमांमुळे महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
ऑगस्टअखेरपर्यंत मेट्रो शिवाजीनगरपर्यंत
माण- हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गातील पहिला टप्पा 15 जुलै, तर दुसर्या टप्प्यात चार स्थानके सुरू करण्यात येतील. यामध्ये शिवाजीनगर स्थानकाचाही समावेश आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना अखेरपर्यंत शिवाजीनगर ते हिंजवडी अशी मेट्रो धावणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.