PCMC Auditorium Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Auditorium Scam: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ५०.७० लाखांचा अपहार; १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई

भाडे व अनामत रक्कम वसुलीत गंभीर गैरप्रकार; महापालिकेच्या आर्थिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत (डिपॉझिट) रक्कम वसुलीत तब्बल 50 लाख 70 हजार 626 रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या क्रीडा विभागातील 15 कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

प्रेक्षागृह भाड्याने देताना अनामत रक्कम न घेणे, जमा झालेल्या भाड्याची परस्पर विल्हेवाट लावणे, कार्यक्रमांची नोंद न ठेवणे, तसेच, साहित्य व साधनसामग्रीचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका संबंधित कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील आर्थिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेची शहरात पाच नाट्यगृहे व प्रेक्षागृहे आहेत. त्यामध्ये चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी-प्राधिकरणमधील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह यांचा समावेश आहे. खासगी सभागृहांच्या तुलनेत दर वाजवी असल्याने या ठिकाणी व्यावसायिक नाटके, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक तसेच, खासगी कार्यक्रमांची मोठी वर्दळ असते. मात्र, चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सन 2018 ते 2023-24 या कालावधीत कार्यक्रमांचा हिशेबच ठेवण्यात आला नसल्याचे तपासणीत उघड झाले. या काळात लिपिक, मुख्य लिपिक, व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जमा झालेल्या रकमेची महापालिकेच्या तिजोरीत भर न करता ती थेट स्वतःच्या खिशात घातल्याचा संशय आहे.

वेळेत धनादेश सादर न केल्याने पालिकेचे नुकसान

क्रीडा विभागाने हा अहवाल पुढील चौकशी व कारवाईसाठी प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. सुरुवातीला सुमारे 20 लाख रुपयांच्या अपहाराचा संशय होता. मात्र, तपासात हा आकडा वाढत गेला. या प्रकरणात लिपिक, मुख्य लिपिक, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी यांचीही चौकशी सुरू आहे. त्यानुसार 42 लाख 68 हजार 215 रुपये वसूलपात्र आणि 8 लाख 3 हजार 411 रुपये आक्षेपाधीन ठेवण्यात आले आहेत. नाट्यगृह भाड्याने देताना 15 दिवस आधी अनामत रक्कम घेण्याची नियमावली असताना ती पाळली गेली नाही. काही संस्थांचे धनादेश वेळेत सादर न केल्यामुळेही महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये खासगी नाट्यसंस्था, राज्य शासन व महापालिकेच्या कार्यक्रमांचाही समावेश आहे.

कार्यक्रमांच्या नोंदीत तफावत

क्रीडा विभागाने 1 एप्रिल ते 27 जुलै 2023 या कालावधीची प्रातिनिधिक तपासणी केली. विद्युत विभागाच्या नोंदीनुसार या काळात 140 कार्यक्रम झाले होते. मात्र, प्रेक्षागृह कर्मचाऱ्यांच्या नोंदीत केवळ 35 कार्यक्रम दाखविण्यात आले. हा प्रकार गंभीर असल्याने मोरे प्रेक्षागृहासह इतर नाट्यगृहांमध्येही अशा गैरप्रकारांची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील अनामत रक्कम, भाडे वसुली, सामान्य पावती, इतर भाडे व आकार पावतीत मोठ्या प्रमाणावर अपहार झाला आहे. त्यामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांवरील दोषारोप निश्चित झाले आहेत.
पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT