PCMC Rakshak Chowk Flyover Damage Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Rakshak Chowk Flyover Damage: रक्षक चौक उड्डाणपुलाची दोन महिन्यांतच दुरवस्था; पहिल्याच पावसात खड्ड्यांनी उघड केली कामाची पोलखोल

कोट्यवधींच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; पुलाच्या सुरुवातीलाच रस्ता खचला, वाहनचालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: महापालिकेच्‍या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून सांगवी फाटा ते किवळे मार्गावरील रक्षक चौक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी थाटामाटात उद्‌घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ अवघ्या दोन महिन्यांतच उघडे पडले असून, वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय...

कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेला रस्ता पहिल्याच पावसाचा मारा सोसू शकला नाही. याबद्दल नागरिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. "अवघ्या दोन महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडतातच कसे? ठेकेदाराने दर्जेदार काम केले की नाही याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली नव्हती का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करीत आहेत. महापालिका प्रशासन आता तरी जागे होऊन या उड्डाणपुलाची तातडीने डागडुजी करणार का, की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सिग्नलमुक्त प्रवासाच्या उद्देशाला 'खड्ड्यांचे' ग्रहण

सांगवी फाटा ते किवळे या मार्गावरील रक्षक चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि शहरातील वाढत्या वाहनांचा ताण लक्षात घेऊन महापालिकेने येथे व्हेईक्युलर अंडरपास (VUP) आणि उड्डाणपूल उभारला आहे. औंध ते सांगवी फाटा आणि रावेतपासून पुढे किवळेपर्यंतचा प्रवास सिग्नलमुक्त व सुसाट व्हावा हा यामागील मुख्य उद्देश होता. मात्र, पुलावर चढताना सुरुवातीलाच डांबरीकरण उखडून खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना ब्रेक दाबावा लागत आहे.

वाहतूक संथगतीने; अपघाताची भीती

उड्डाणपुलाच्या तोंडावरच रस्त्याची चाळण झाल्यामुळे सुसाट वेगाने येणारी वाहने अचानक संथ होत आहेत. परिणामी, या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे. पाऊस सुरू असताना हे खड्डे पावसाच्या पाण्याच्या अंदाजामुळे दिसत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ज्या उद्देशाने उड्डाणपूल बांधला, तो उद्देश या खड्ड्यांमुळे धोक्यात आला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला पूल दोन महिन्यांतच खराब होतो, हे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच गाडी खड्ड्यात आदळत असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन मोठा अपघात होऊ शकतो. पालिकेने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि दोषी ठेकेदारावर कारवाई करावी.
संजय मेमाणे, वाहनचालक
रक्षक सोसायटी चौकातील उड्डाणपुलाचे नुकतेच दोन महिन्यांपूर्वी उद्‌घाटन करून वापरास सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी पूल सुरू होतो त्या ठिकाणी रस्ता खचून खड्डा तयार झाला आहे. याशिवाय पुलावरती रस्ता खचला आहे. रात्रीच्या वेळी वाहनांची गर्दी जास्त असते त्या वेळेला अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पूलावरती हे प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
डॉ. चंद्रशेखर पवार, पर्यावरण अभ्यासक, पिंपळे गुरव.
सदर ठिकाणची पाहणी करावी लागेल. पुलाचे कामकाज माझ्याकडे होते. मात्र, उड्डाणपुलावरील डांबरीकरण करून रस्ता सुरळीत करून देण्याचे काम शहरी दळणवळण विभागाकडे होते. याबाबत पाहणी करून चौकशी करण्यात येईल.
प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिं. चिं. मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT