Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Property Tax Hike: पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायट्यांवर मालमत्ताकराचा भार वाढला; पार्किंग व अ‍ॅमेनिटी स्पेसवरही कर लावल्याने संताप

महापालिकेच्या 2026-27 बिलात नव्या कर आकारणीमुळे नागरिक नाराज; सुविधा न देता कर वसुलीचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2026-27 वर्षातील बिलात हाऊसिंग सोसायटीतील पार्किंग तसेच, अ‍ॅमेनिटीज स्पेसलाही मालमत्ताकर लावण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोसायट्यांना मूलभूत नागरी सुविधा न देता अशा प्रकारे कर वसूल करण्याची पद्धत अन्यायकारक आहे. महापालिका प्रशासनाच्या या प्रकारामुळे सदनिकाधारकांवर आर्थिक बोजा वाढत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंववड महापालिकेकडे शहरातील 7 लाख 44 हजार 630 निवासी व बिगरनिवासी मालमत्तांची नोंद आहे. त्यात सर्वांधिक संख्येने निवासी मालमत्तांचा समावेश आहे. शहरातील लाखो मालमत्तांंची महापालिकेकडे नोंद नव्हती. त्यामुळे महापालिकेने खासगी एजन्सी नेमून शहरात नोंद नसलेल्या आणि वापरात बदल केलेल्या मालमत्तांचा शोध घेतला. त्यात साडेतीन लाखांपेक्षा अधिक नोंद नसलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या करसंकलन विभागाने केला आहे.

शहरातील अनेक हाऊसिंग सोसायट्या आणि अपार्टमेंटमधील सामूहिक पार्किंगची नोंद मालमत्ताकरात नव्हती. त्या खासगी एजन्सीने सर्व हाऊसिंग सोसायट्या व अपार्टमेंटमधील सामूहिक पार्किंग, अ‍ॅमेनिटीज स्पेस, उद्यान, क्रीडांगण, क्लब हाऊस, व्यायाम शाळा, सभागृह, जलतरण तलाव, स्वच्छतागृह, एसटीपी, कंपोस्ट खत निर्मिती केंद्र आदींना त्या एजन्सीने निवासी दराने मालमत्ताकर लावला आहे. ती नोंद नव्याने झाल्याने यंदाच्या चालू आर्थिक वर्षातील सन 2026-27 च्या मालमत्ताकर बिलात सोसायटीचे पार्किंग व अ‍ॅमेनिटीज स्पेसला मालमत्ताकर लावल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सदनिकाधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अ‍ॅमेनिटीज स्पेसमध्ये नागरी सुविधा निर्माण केल्या जातात. उद्यान, बाग, क्रीडांगण, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्लब हाऊसची सुविधा असते. तसेच, मोकळ्या जागेत झाडे लावलेली असतात. त्या सर्व जागांनाही मालमत्ताकर लावण्यात आला आहे.

सदनिकाधारक वर्षाकाठी 10 ते 30 हजार रुपये मालमत्ताकर भरत आहेत. आता, या नव्या करामुळे सदनिकाधारकांवर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच, सोसायट्यांवरही मोठा भार पडणार आहे. या नव्याने लागू करण्यात आलेल्या मालमत्ताकरामुळे मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना दीड ते दोन लाखांचा कर लावण्यात आला आहे. या नव्या आर्थिक ताणामुळे सोसायटीचे धाबे दणाणले आहेत. पार्किंग, अ‍ॅमेनिटीज स्पेसला लावण्यात आलेला तो कर अन्यायकारक असल्याने त्याला विरोध होत आहे.

पालिकेकडून सुविधा नाहीत, मग हा कर कशासाठी ?

महापालिकेकडून हाऊसिंग सोसायट्यांना पिण्याचे पाणी दिले जात नाही. ते वर्षभर विकत आणावे लागते. आता कचरा उचलला जात नाही. तो आम्हीच जिरवायचा. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्लाण्ट आम्हीच करायचे. महापालिकेचे पार्किंग झोन नाहीत. मग, सोसायटीतील पार्किंग आणि अ‍ॅमेनिटीज स्पेसला महापालिका मालमत्ताकर कर कसा काय लावू शकते? सदनिकाधारकांकडून निव्वळ ओरबाडून खाण्याची महापालिकेची प्रवृत्ती चुकीची आहे. नोकरदार सदनिकाधारक हा आर्थिक बोजा निमूठपणे सहन करत आहेत. महापालिका बांधकाम परवानगी देताना अ‍ॅमेनिटीज स्पेससाठी जागा सोडण्याची अट घालते. नियमानुसार असलेल्या जागांवर आता कर का लावता, असे पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे माजी अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी सांगितले.

हाऊसिंग सोसायट्यांचा विरोध

शहरातील काही हाऊसिंग सोसायट्यांनी या मालमत्ताकराला विरोध केला आहे. पार्किंग आणि अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागा कोणत्याही व्यावसायिक फायद्यासाठी नाहीत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांसाठी आहेत. त्यामुळे या ओपन अ‍ॅमेनिटीजवर मालमत्ताकर लावणे अन्यायकारक आहे. तो रद्द करण्याची मागणी सोसायट्यांकडून करण्यात येत आहे.

पार्किंगला निवासी दराने मालमत्ताकर

हाऊसिंग सोसायटी व अपार्टमेंटमधील सामूहिक पार्किंगला यंदाच्या बिलात मालमत्ताकर आकारण्यात आला आहे. तो निवासी दराने कर लावण्यात आला आहे. मात्र, व्यावसायिक वापर असल्यास पार्किंग व अ‍ॅमेनिटीज स्पेसला बिगरनिवासी मालमत्ताकर लावला गेला आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दावा केला आहे.

सोसायटीबाहेरील अ‍ॅमेनिटीज स्पेसला कर लावणार का ?

बांधकाम व्यावसायिकांनी अ‍ॅमेनिटीज स्पेस तयार केली आहे. त्याचा लाभ करदाते नागरिक घेत आहे. त्याला पुन्हा मालमत्ताकर लावणे अयोग्य आहे. हा प्रकार मुळात चुकीचा आहे. जर, अ‍ॅमेनिटीज स्पेस सोसायटीच्या बाहेर असले, तर महापालिका त्या ठिकाणी कर लावणार का? रावेत भागांतील काही सोसायट्यांचा गेल्या पाच वर्षांचा कर एकत्रितपणे महापालिकेने वसूल केला आहे, असे रावेत हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार यांनी सांगितले.

महापालिका केवळ कर वसूल करते

सोसायटीतील पाणी, कचरा, एसटीपी व इतर खर्चासाठी वर्षाला 20 लाख रुपये खर्च करते. महापालिका कोणत्याही नागरी सुविधा पुरवत नाही. मग, महापालिकेस आम्ही मालमत्ताकर का द्यायचा. पार्किंग आणि अ‍ॅमेनिटीज स्पेसला महापालिकेने नव्याने लावलेला मालमत्ताकर हा चुकीचा आहे. तसा महापालिकेस अधिकार नाही. आम्हीच सर्व खर्च करतो म्हणून महापालिकेने प्रत्येक सदनिकाधारकास 3 हजार रुपयांची सूट द्यावी. त्याबाबत आम्ही महापालिका आयुक्त व सर्व नगरसेवकांना पत्र देणार आहोत, असे पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी सांगितले.

नोंद नसलेल्या अ‍ॅमेनिटीज स्पेसवरही कर

शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्या, अपार्टमेंट येथील पार्किंग आणि अ‍ॅमेनिटीस स्पेसला पूर्वीपासूनच मालमत्ताकर लावण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ज्या सोसायट्यांचे पार्किंग व अ‍ॅमेनिटीज स्पेसला मालमत्ताकर लावण्यात आला नव्हता, त्या सोसायट्यांना लावण्यात आला आहे. त्यानुसार, सन 2026-27 च्या मालमत्ताकर बिलात तशी नोंद करण्यात आली आहे. तो कर यंदा नव्याने सुरू करण्यात आलेला नाही, असे महापालिकेच्या करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT