Pimpri Chinchwad Signboard Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये दिशादर्शक फलकांची दुरवस्था; स्मार्ट सिटी दाव्यांवर प्रश्नचिन्ह

तुटलेले फलक, गायब झालेली माहिती आणि अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराची ओळख धूसर; नागरिकांचा प्रशासनावर रोष
Pimpri Chinchwad Signboard Issue
Pimpri Chinchwad Signboard IssuePudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील रस्त्यांवर उभे असलेले दिशानिर्देशक, उपनगरांची नावे दर्शविणारे फलक, धोक्याच्या सूचना देणारे बोर्ड आणि मार्गदर्शक चिन्हे ही केवळ लोखंडी रचना नसून, शहराची ओळख आणि नागरिकांसाठी मार्गदर्शनाची महत्त्वाची साधने आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात याच फलकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील बहुतांश फलक तुटलेले, वाकलेले, अक्षरे उडालेली किंवा पूर्णपणे ओळख हरवलेल्या अवस्थेत असल्याचे वास्तव दिसून आले.

Pimpri Chinchwad Signboard Issue
Pimpri Chinchwad Illegal Cable Network: आकुर्डी व परिसरात अनधिकृत केबलचे जाळे; स्मार्ट सिटीऐवजी शहर विद्रुपीकरणाचा आरोप

शहराच्या विविध भागांमध्ये केलेल्या पाहणीत दिशानिर्देशक फलकांवरील नावे गायब झालेली, बॅनरबाजीमुळे दडलेली, काही ठिकाणी फक्त लोखंडी चौकट उभी असलेली तर, काही ठिकाणी संपूर्ण फलकच कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे आढळले. नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देणारे धोक्याचे फलकही स्वतःच धोकादायक स्थितीत उभे असल्याने सुरक्षाव्यवस्थेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pimpri Chinchwad Signboard Issue
PCMC Model Code Of Conduct Lifted: पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील आचारसंहिता उठली; कामकाज पूर्ववत सुरू होणार

शहराचा चेहरा विद्रूप करणारे तुटलेले फलक

वाढदिवस, जयंती आणि राजकीय कार्यक्रमांसाठी लावलेले फ्लेक्स काही दिवसांनी काढले जातात. मात्र, त्यासोबत फलकावरील मूळ माहितीही निघून जाते. परिणामी नागरिकांच्या उपयोगाचे फलक केवळ रिकाम्या चौकटी बनून उभे राहतात. रस्ते, चौक आणि उपनगरांच्या प्रवेशद्वारांवर उभे असलेले फलक हे शहराचा चेहरा असतात. जर हाच चेहरा तुटका, जीर्ण आणि दुर्लक्षित दिसत असेल तर, शहराच्या विकासाच्या दाव्यांकडे नागरिक कोणत्या नजरेने पाहतील, हा खरा प्रश्न आहे.

अनधिकृत होर्डिंग्जचा वाढता विळखा

शहरातील अनेक चौक, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय उभारण्यात आलेली अनधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्स नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेकदा ही होर्डिंग्ज दिशा निर्देशक आणि अधिकृत फलक झाकून टाकतात. त्यामुळे महत्त्वाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. काही ठिकाणी कालबाह्य झालेली होर्डिंग्ज अनेक महिने तशीच उभी असल्याचे दिसून येते. पावसाळा आणि जोरदार वार्यामुळे अशा होर्डिंग्ज कोसळण्याचा धोका वाढतो. यापूर्वी राज्यातील विविध शहरांमध्ये होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तरीही शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Pimpri Chinchwad Signboard Issue
PCMC City Engineer Vacancy: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता पद तीन महिन्यांपासून रिक्त; वर्णीसाठी अधिकाऱ्यांची रस्सीखेच

उपाययोजना

  • दिशानिर्देशक, उपनगर फलक आणि सूचना फलकांचे सर्वेक्षण व ऑडिट करावे

  • खराब फलक बदलून नवीन बसवावेत

  • अधिकृत फलकांवर बॅनर, फ्लेक्स किंवा जाहिराती लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी

  • प्रत्येक विभागासाठी फलकांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करावी

  • फलकांवर प्रतिबिंबित शीटचा वापर करून रात्रीही माहिती स्पष्ट दिसेल याची व्यवस्था करावी

  • मुख्य रस्ते, चौक आणि उपनगरांतील फलकांची दर सहा महिन्यांनी तपासणी करावी

  • तक्रारीसाठी हेल्पलाईन किंवा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी

बॅनरबाजीचा फलकांना फटका

शहरात विविध जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस, राजकीय कार्यक्रम आणि उत्सवांच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली जाते. अनेकदा हे फ्लेक्स अधिकृत दिशा निर्देशक आणि सूचना फलकांवरच लावले जातात. कार्यक्रम संपल्यानंतर फ्लेक्स काढताना त्यासोबत फलकावरील मूळ डिजिटल प्रिंटही निघून जाते. परिणामी लाखो रुपयांच्या खर्चातून उभारलेले फलक काही क्षणांत ओळख गमावून बसतात. अनेक ठिकाणी फ्लेक्स काढल्यानंतर त्याचे फाटलेले तुकडे महिनोनमहिने तसेच लटकताना दिसतात. वाऱ्यामुळे हे तुकडे रस्त्यावर उडून नागरिकांच्या अंगावर पडण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी दुचाकीस्वारांना त्याचा फटका बसल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Signboard Issue
Made In Pakistan Blanket Controversy: चिंचवड यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ चादरीचा दावा; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांचा तपास सुरू

दिशा दाखवणारे फलकच झाले दिशाहीन

उपनगरांची नावे दर्शविणारे अनेक फलक शहरातून अक्षरशः गायब झाले आहेत. काही ठिकाणी फक्त खांब उभे आहेत. तर, काही ठिकाणी माहितीच पुसली गेली आहे. शहरात प्रथमच येणारे नागरिक, बाहेरगावचे प्रवासी, रुग्णवाहिका चालक, डिलिव्हरी कर्मचारी आणि इतर वाहनचालक यांना यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्न

एका बाजूला शहर सुशोभीकरण, स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला शहराची ओळख सांगणारे मूलभूत फलकच दुर्लक्षित अवस्थेत दिसत आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर सर्वप्रथम प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींपैकी रस्ते, स्वच्छता आणि दिशा निर्देशक फलक हे महत्त्वाचे घटक मानले जातात. मात्र, सध्या दिसणारे चित्र शहराच्या प्रतिमेलाच धक्का देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे. धोक्यापासून सावध राहण्याचा संदेश देणारे फलक स्वतःच पडण्याच्या अवस्थेत आहेत. दिशा दाखवणारे फलक दिशाहीन झाले आहेत आणि शहराची ओळख सांगणारे बोर्ड ओळख हरवून बसलेले दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news