Property Tax Pudhari
पिंपरी चिंचवड

Property Tax Collection PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ताकर वसुलीत मोठी वाढ; सवलत योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद

3.8 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांचा कर भरणा; ऑनलाईन व विविध सवलतींचा मोठ्या प्रमाणावर लाभ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मालमत्ताकर भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सवलत योजनांना शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत सुमारे 3 लाख 80 हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला असून, त्यापैकी 3 लाख 62 हजार 57 जणांनी विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

शहरात 7 लाख 44 हजारांहून अधिक मालमत्ता

महापालिकेकडून 30 जून 2026 पूर्वी मालमत्ता कर भरणार्‍या मालमत्ताधारकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन आगाऊ कर भरल्यावर मिळणार्‍या 10 टक्के सवलतीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, 3 लाख 8 हजार 453 जणांनी डिजिटल माध्यमातून कराचा भरणा केला आहे.

आगाऊ कर भरणा, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग, माजी सैनिक, शौर्य पदकधारक, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे तसेच प्रामाणिक करदाते अशा विविध गटांनाही महापालिकेच्या सवलत योजनांचा लाभ मिळाला आहे. शहरात 7 लाख 44 हजारांहून अधिक मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी 3 लाख 80 हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आतापर्यंत 436 कोटी 20 लाख रुपयांचा कर भरला आहे, अशी माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

मालमत्ताकर भरून महापालिकेस सहकार्य करा

करदात्यांच्या सोयीसाठी विविध सवलती, ऑनलाइन करभरणा सुविधा तसेच, विभागीय करसंकलन कार्यालयांमार्फत आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपलब्ध सवलतींचा लाभ अधिकाधिक मालमत्ताधारकांनी घ्यावा. तीस जूनपूर्वी मालमत्ताकराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

30 जूनपर्यंत लागू असलेल्या सवलतींचा लाभ घेतलेले मालमत्ताधारक

  • ऑनलाईन आगाऊ भरणा : 3 लाख 8 हजार 453

  • प्रामाणिक करदाता : 46 हजार 973

  • पर्यावरणपूरक सवलत : 41 हजार 640

  • आगाऊ भरणा : 31 हजार 511

  • महिला : 16 हजार 314

  • माजी सैनिक : 3 हजार 994

  • दिव्यांग : 1 हजार 782

  • शौर्य पदकधारक : 3

  • एकूण लाभार्थी : 3 लाख 62 हजार 57

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT