पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील थकबाकीदार मालमत्तांवर 30 सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करावी. प्राधान्याने औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच, इतर मालमत्ता सील कराव्यात, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवार (दि.22) कर संकलन विभागास दिले आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या कर वसुलीबाबतची आढावा बैठक आयुक्तांनी घेतली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व प्रशासन अधिकारी, सहाय्यक मंडलाधिकारी आदी उपस्थित होते. मालमत्ताकर वसुली, मालमत्ता हस्तांतरण, चालू वर्षातील नवीन मालमत्तांचीकर आकारणी, थकबाकीदार मालमत्ताधारक तसेच, फुगीर मागणी याबाबत विभागनिहाय माहिती बैठकीत घेण्यात आली. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून वसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
तीस सप्टेंबरनंतर थकबाकीदार मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवताना प्राधान्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच, इतर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करावी. थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही प्रभावीपणे राबवावी. विभागनिहाय नियोजन करून करवसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
नवीन बांधकामांना तत्काळ मालकत्ताकर लावा
शहरातील अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी. नवीन बांधकामांची माहिती संकलित करून पात्र मालमत्तांची कर लागू करावा. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ताकराची वसुली वाढविण्यासाठी विभागनिहाय नियोजन, थकबाकीदारांचा सातत्याने पाठपुरावा व प्रभावी वसुली मोहीम राबविवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
चार टक्के सवलतीसाठी शेवटचे ८ दिवस
ऑनलाइन मालमत्ताकर भरणार्या मालमत्ताधारकांना सामान्यकरात 4 टक्के सवलत दिली जाते. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे 8 दिवस शिल्लक असून, 30 सप्टेंबर ही सवलत मिळण्याची अंतिम तारीख आहे. आतापर्यंत 592 कोटी 74 लाख मालमत्ताकर जमा झाला आहे. मालमत्ताधारकांनी मुदत संपण्यापूर्वी आपला मालमत्ताकर ऑनलाइन भरून 4 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.