Pavanathadi Jatra 2026 Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Pavanathadi Jatra 2026: पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात; सांगवीत 1 मार्चपर्यंत रंगणार उत्सव

महिला बचत गटांचे स्टॉल, चटपटीत खाद्यपदार्थ आणि दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची पवनाथडी जत्रा बुधवार (दि.25) पासून सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे सुरू होणार आहे. जत्रा रविवार (दि.1) पर्यत रंगणार आहे. जत्रेत महिला बचत गटांनी तयार केलेले सुचकर आणि चटपटीत असे वेगवेगळ्या प्रकाराचे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थासह महिलांच्या सौदर्य प्रसाधन, सजावटीचे वस्तू, कपडे, लोणचे, पापड, मसाले आदींचे स्टॉल असणार आहेत. या जत्रेचा नागरिकांनी सहकुटुंब आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून दरवर्षी पवनाथडी जत्रा भरवली जाते. जत्रेचे उद्घाटन बुधवारी सकाळी दहाला महापौर लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. जत्रेत प्रवेश मोफत आहे. तसेच, पार्किंग मोफत आहे.

जत्रेत नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे तसेच, विविध उपयुक्त वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहे. त्या माध्यमातून महिला उद्योजकतेला चालना मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमात महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक हस्तकलेचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दररोज सांस्कृतिक कार्यक्रम

जत्रेत महापालिकेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ते कार्यक्रम दररोज सायंकाळी सहाला होणार आहेत. ते कार्यक्रम मोफत असून, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असे आहेत कार्यक्रम : बुधवार-महाराष्ट्राची मराठी बाणा, गुरुवार -होम मिनिस्टर कार्यक्रम, शुक्रवार- ऑर्केस्ट्रा म्युझिकल स्टार्स, शनिवार-फोक संस्कृती, रविवार-द फोक लावणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT