Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Nominated Corporators Issue: स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुन्हा गोंधळ; विरोधकांचा सभागृहात राडा

भाजपाकडून विषय पुन्हा तहकूब; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा, महापौरांना सभा तहकूब करावी लागली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: स्वीकृत दहा नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधारी भाजपाकडून पुन्हा तहकूब करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला. आमच्या तीन नावांची निवड केली जावी. भाजपाने आपल्या सात नावांची घोषणा सवडीनुसार करावी, असा सल्ला देऊनही त्याला सत्ताधाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने राष्ट्रवादीने महापौर आसनाच्या हौदात येत, दादागिरी नही चलेगी, अशी घोषणाबाजी करीत राडा घातला. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून महापौरांनी सभाच तहकूब केली.

सत्ताधाऱ्यांकडून कोश्यारी पॅटर्न ?, विरोधकांच्या कोंडीसाठी स्वीकृत नगरसेवकांची यादी अडविली; मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत निवड होणार नसल्याचे संकेत, असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने 1 मे रोजी प्रसिद्ध केले होते. ते वृत्त खरे ठरले आहे. महापालिकेच्या मंगळवारी (दि.5) झालेल्या सर्वधारण सभेच्या विषयपत्रिकेवर स्वीकृत नगसेवकांची निवड हा पहिलाच विषय होता. एकमत न झाल्याने अद्याप स्वीकृत नगरसेवकांची सात नावे निश्चित झालेली नाहीत.

सत्ताधाऱ्यांनी तो विषय मंगळवारी पुन्हा तहकूब करावा लागला. विनोद नढे यांनी तहकूबी मांडली.त्याला कुशाग्र कदम यांनी अनुमोदन दिले. त्यावर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तीव्र आक्षेप घेतला. भाजपा नगरसेवकाने विषय मांडला. त्याला अनुमोदन दिले. नंतर तो विषय तहकूब करणे, हे कामकाजाला धरून नाही. आमच्या पक्षाच्या तीन सदस्यांची निवड करा. भाजपाची नावे नंतर ठरवा. अधिकार मला दिल्यास मी सात नावे देतो. भाजपाचे इच्छुक नाराज आहेत. नाव जाहीर करण्यासाठी आमच्याकडे आग्रह धरत आहेत. राष्ट्रवादीने दिलेले नावे वैध आहेत. तो विषय प्रशासनाने सभागृहासमोर आणला आहे. ती नावे जाहीर करा. भाजपाने आपली नावे वर्ष भराने जाहीर करावीत. त्याला आमची हरकत नाही, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

योगेश बहल यांनीही राष्ट्रवादीच्या तीन नावांची घोषणा करण्याची मागणी केली. तो विषय तहकूब करू नका. तसेच, संदीप वाघेरे यांनीही आक्षेप घेतला. तर, दुसरीकडे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे बोलू लागले. त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू ठेवण्याची महापौरांना विनंती केली. महापौरांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत सभा कामकाज चालूच ठेवले. त्यानंतर सुधारित डीपीच्या हरकतीवर सुनावणीसाठी स्थायी समितीच्या तीन सदस्यांची निवड करण्याचा दुसर्या क्रमांकाचा विषयही तहकूब करण्यात आला. त्यामुळे विरोधकांचा संताप आणखी वाढला. विरोधकांनी गोंधळ घालत, महापौर आसनासमोरील हौदात गर्दी केली. दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा देण्यात आल्या.

महापौर रवी लांडगे यांनी चहा पिता पिता विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले. येत्या 15 मे रोजीच्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाईल. केवळ दहा दिवस थांबा, असे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पाणीपुरवठा या गंभीर प्रश्नावर चर्चा करावी, अशी विनंती महापौरांना केली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून महापौरांनी अचानक सभा 15 मिनिटासाठी तहकूब केली. त्यामुळे आक्रमक झालेले विरोधक निमुठपणे आसनावर जाऊन बसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT