पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरूवार (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला आहे. महापालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शहरभरात 2 हजार 67 मतदान केंद्रे आहेत. तर मतमोजणी शुक्रवार (दि. 16) आठ ठिकाणी होणार आहे.
महापालिकेसाठी 32 प्रभागांत 128 जागा आहेत. त्यासाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 6 व 10 मधून अनुक्रमे भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता 126 जागांसाठी मतदान होत आहे. एका मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. निवडणुकीसाठी 10 हजार 335 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात 2 हजार 67 मतदान केंद्रांमध्ये एकूण 7 हजार 149 मतदान यंत्र (ईव्हीएम-बॅलेट युनिट) आणि 2 हजार 900 कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई असेल. केंद्रांकरिता साहित्याचे किट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य तसेच, कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी एकूण 521 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात पीएमपीएल बसचा समावेश आहे.
मतदान यंत्रे सील करण्यास सुरुवात
महापालिका निवडणुकीसाठी लागणार सर्व ईव्हीएम मशिन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. ते मशिन सुव्यस्थित असल्याची खात्री करून घेण्यात आली आहे. ते ईव्हीएम मशिन शहरातील आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे पाठवले जात आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर ईव्हीएम मशिन सील करण्यास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.
महापालिका भवनात टपाली मतदानांची सोय
निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी टपाली मतदानाची सोय केली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पिंपरी येथील महापालिका भवनात दुसर्या मजल्यावर टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. कर्मचारी टपाली मतदान करत आहेत.
असे रोखणार दुबार मतदान
महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 92 हजारांपेक्षा अधिक दुबार मतदार आहेत. या मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार येथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास त्या मतदार यादीत तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे.