

खराळवाडी: पिंपरी-भोसरी उपनगर मार्गावरील गोकुळ हॉटेलजवळील बसथांब्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पीएमपीने मागच्या काही दिवसांत पिंपरी शहर, उपनगरातील बसथांबे उभारले; परंतु त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत पिंपरी ते भोसरी उपनगर मार्गावर लांडेवाडी चौकापर्यंतच्या शहर बस वाहतुकीच्या थांब्यांची साधी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. प्रवाशांसाठी बसथांबे उभारण्यासाठी लाखो रुपयांचा निधी पीएमपीने खर्च केला आहे; परंतु दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी न घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.
प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच पिंपरी शहर, उपनगरातील बसथांब्यांवरील मोडकळीस आलेल्या शेडमुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा येत आहे. गोकुळ हॉटेल ते लांडेवाडी चौकादरम्यान असलेल्या बहुतेक पिंपरी शहरातील बसथांब्यावरील शेडच गायब झाले आहेत. काही बसथांब्यांवरील शेडची समोरील बाजूच गायब झालेली आहे. काही बसथांब्यांच्या समोरच फलक फाटलेला आहे. बाजूला कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने, येथे प्रवाशांना नाक दाबून उभे राहावे लागते. काही बसथांब्यांचे पत्रे उखडलेले, तुटलेले आहेत.
तसेच लोखंडी पाईप खराब झाले आहेत. असे बसथांबे प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहेत. पुढे काही अंतरावर पिंपरी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत खरेदीसाठी ग््रााहकांची ये-जा मोठ्या संख्येने सुरू असते, म्हणून गोकुळ हॉटेल बसथांब्यावर प्रवासी सतत प्रवास करत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी अडगळ निर्माण झाली आहे. बसथांब्यांच्या या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांना नाईलाजाने धोका पत्करून मुख्य रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.
बसथांब्यांवर तळीरामांचे ठाण
नेहरुनगरकडे जाताना गांधीनगर येथील बसथांब्याच्या शेडमध्ये तळीराम ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे येथे प्रवाशांना उभे राहता येत नाही. या ठिकाणी प्रवासी आल्यास तळीराम येथे पार्टी करीत बसलेले असतात. उलट प्रवाशांना हमरी तुमरीची भाषा करायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रवासी शेडपासून लांब थांबतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात हे तळीराम निवाऱ्याला या बसथांब्याचा वापर करतात.
गोकुळ हॉटेल ते लांडेवाडी उपनगर मार्गावर पिंपरी शहर बसथांब्यांवरील प्रवासी शेडची सध्या खूपच दुरवस्था झाली आहे. यातील बहुतेक बसथांब्यांवर रात्रीच्या वेळी उजेड नसतो. त्यामुळे येथे खासकरून महिला प्रवाशांची गैरसोय होते. रात्रीच्या वेळी टवाळखोरांचादेखील मोठा वावर असतो.
नरवीर गायकवाड, प्रवासी