Illegal Construction Action Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Illegal Construction Action: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; ८३ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे

क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांची धडक कारवाई; पत्राशेड, टपऱ्या, हातगाड्या आणि अतिक्रमणांवरही कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण सुमारे 83 हजार 99 चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्यात आले. यामध्ये आरसीसी स्वरूपाची अनधिकृत बांधकामे, अनधिकृत पत्राशेड, नव्याने सुरू असलेली बांधकामे तसेच, पदपथावरील अनधिकृत टपर्‍या, हातगाडी व इतर अतिक्रमणांचा समावेश आहे.

अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील साईनगर, निगडी परिसरात अंदाजे 3 हजार 498 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शगुन चौक, पिंपरी मार्केट, एम्पायर उड्डाण पुलाखाली चिंचवड व वाल्हेकरवाडी परिसरात 10 हजार 538 चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे काढण्यात आले. क क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत चिखली, कुदळवाडी, शिवरोड, रवी रंजन वजन काटा चिखली व चिंचवड डी-मार्ट शेजारील परिसरात 12 हजार 723 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 5 हजार 400 चौरस फूट, ई क्षेत्रीय कार्यालयाच्या भोसरी व मोशी परिसरात 7 हजार 965 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या मोरे वस्ती, चिखली, तळवडे व नेवाळे वस्ती परिसरात सर्वाधिक 19 हजार 400 चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढण्यात आले.

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या राजवाडे नगर, गोकुळवाडी, पवनानगर, स्वप्ननगरी कॉलनी, काळेवाडी, डोंगरे कॉर्नर, मंगल नगर व थेरगाव परिसरात 13 हजार 35 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सांगवी परिसरात 1 हजार 86 चौरस फूट, ज क्षेत्रीय कार्यालयाच्या वाल्हेकरवाडी, वाकडमधील दत्त मंदिर रस्ता, पिंपळे निलख व किवळे परिसरात 6 हजार 28 चौरस फूट आणि ल क्षेत्रीय कार्यालयाच्या भोसरी, इंद्रायणी नगर, संत तुकाराम नगर व पिंपरी परिसरात 3 हजार 426 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.

शहरात कारवाई नियमितपणे सुरू राहणार

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे. अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे करू नयेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शहराचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध स्वरूप कायम ठेवण्यासाठी यापुढेही क्षेत्रीय कार्यालयानुसार नियमित कारवाई सुरू राहणार आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT