PCMC General Body Meeting Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC General Body Meeting: काँग्रेसचा निषेध करत महापालिका सर्वसाधारण सभा तहकूब

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: वंदे मातरम‌् या राष्ट्रगीताचा काँग्रेस पक्षाने अवमान केल्याचा आरोप करत त्या पक्षाचा निषेध करीत सत्ताधारी भाजपने महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब केली. सभा 17 सप्टेंबरला दुपारी एकला होणार आहे. महापालिका सभागृहात काँग्रेसचा एकही नगरसेवक नसल्याने सत्ताधार्‍यांच्या कृतीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. सभागृहात निगडी ते चाकण मार्गाच्या सुधारित मेट्रो मार्गाच्या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर बोर्‍हाडेवाडी, मोशी ते वाकड चौक या बीआरटीएस मार्गावर सुरू करण्यात येणार्‍या ई-आरटीएस ही सार्वजनिक वाहतूक सुविधेचेही सादरीकरण करण्यात आले.

त्यावर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आक्षेप घेतला. एकाच वेळी इतके सादरीकरण केल्याने सभागृहाचा गोंधळ उडाला आहे. या महत्त्वाच्या विषयांकडे कोणाचे लक्ष नाही. सादरीकरण कोणाला समजतही नाही.

सादरीकरणासाठी स्वतंत्र दिवस ठरवावा. आता सभेचे विषयावर कामकाज करावे, अशी सूचना त्यांनी केली. योगेश बहल यांनी स्क्रीनवरील काही दिसत नसल्याची तक्रार केली. त्यावर महापौर रवी लांडगे यांनी नगरसेवकांसाठी मेट्रो व ई-आरटीएसचे स्वतंत्रपणे सादरीकरण करा, असे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

त्यानंतर भाजपचे विनोद नढे यांनी वंदे मातरम गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधानांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वंदे मातरम‌् गीताचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसचा निषेध केला. त्याला भाजपचे शीतल शिंदे यांनी अनुमोदन दिले.

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनीही वंदे मातरम‌् राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल काँग्रेसवर ताशेरे ओढले. सभा कामकाज तहकूब करण्याची सूचना महापौरांना केली. त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी महापौर आसनाच्या हौदात येत वंदे मातरम‌्, भारत माता की जय... च्या घोषणा सुरू केल्या.

महापालिका भवनाच्या पायर्‍यांवर भाजपची घोषणाबाजी

महापौर लांडगे यांनी एप्रिल, मे आणि जून महिन्यातील सभावृत्तांत कायम केल्याचे घोषित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांनी सभा तहकूब करण्यास विरोध केला. भाजपच्या एका तरी नगरसेवकाने संपूर्ण वंदे मातरम‌् गावून दाखवल्यास सभा एक काय दोन महिने तहकूब करा, असे आव्हान त्यांनी सत्ताधार्‍यांना दिले.

त्यावर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटनेते विश्वजीत बारणे यांनी सभा 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब न करता, दहा मिनिटांसाठी करा, अशी सूचना केली. सभागृहात संपूर्ण वंदे मातरम‌् एकाही नगरसेवकाला म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.

त्यावरून सभागृहात गोंधळ झाला. भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. अखेर, महापौर लांडगे यांनी 17 सप्टेंबरपर्यंत सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी महापालिका भवनाच्या पायर्‍यावर घोषणाबाजी केली.

काँग्रेसचा एकही नगरसेवक नसताना भाजपच्या भूमिकेबाबत आश्चर्य

दिल्लीतील संसदेत स्त्री शक्ती विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी भाजपने काँग्रेसचा निषेध करत सर्वसाधारण सभा तहकूब केली होती. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेसचा निषेध करत भाजपने सभा पुन्हा तहकूब केली आहे.

महापालिकेत फेब्रुवारी 2017 पासूनच्या दोन पंचवार्षिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. असे असताना सभागृहात काँग्रेसचा निषेध करणे. तसेच, थेट महिनाभर सभा तहकूब करण्याच्या भाजपची कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी चालून आली आहे.

सत्तारूढ पक्षनेत्यास सत्तेचा माज चढल्याचा शिवसेनेचे टीकास्त्र

महिन्यात एकदा होत असलेली सर्वसाधारण सभा केंद्रस्तरावरील विषयावर तसेच, महापालिकेशी संबध नसलेल्या काँग्रेससाठी तहकूब करणे चुकीचे आहे. सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी महापौरांवर सभा तहकूब करण्यासाठी दबाव टाकला. महापौरांना ते कामकाज करू देत नाहीत. त्यांना सत्तेचा माज आला असून, ते सुपारीबाज आहेत.

त्यांना महापौराच्या खुर्चीवर बसायचे आहे, असा आरोप शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सुलभा उबाळे यांनी केला आहे. सभा सुरू असताना महापौराच्या डायसवर प्रशांत शितोळे यांचा मुक्त वावर हा सभागृहाचा अपमान आहे. मागील सभेत शहर अभियंत्यांची तीन पदे निर्माण करण्याची वादग्रस्त उपसूचना त्यांचीच होती.

काँग्रेसचा एकही नगरसेवक महापालिकेत नसताना सभा महिन्याभर तहकूब करण्याचा मोठा निर्णय घेण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नव्हते. महापौरांना काम करू दिले जात नाही. त्यांना अंधारात ठेवून तहकुबीचा निर्णय घेतला गेला.

भाजपच्या नगरसेवकांना काम कसे करायचे हेच कळत नाही. काही नगरसेवक तर, हुजरेगिरी करण्यात मश्गुल आहेत. तेच घोषणा देण्यात पुढे होते. नागरिकांचे प्रश्न वेळेत न सुटल्यास पाच वर्षांनंतर ते लोकांना तोंड कसे दाखवणार, अशी टीका उबाळे यांनी केली.

दहा मिनिटे सभा तहकूब करता आली असती

निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआरचा महत्त्वाचा विषय सभेसमोर होता. त्या विषयाला महिनाभर उशीर झाल्याने राज्य व केंद्राची मंजुरी मिळून प्रत्यक्ष निविदाप्रक्रिया राबवण्यात आणखी विलंब होणार आहे.

अशा प्रकारामुळे सन 2032 पर्यंत त्या मार्गावर मेट्रो कशी धावू शकेल. तसेच, पाणीपुरवठा, पार्किंग, कचरा असे महत्त्वाचे विषय सभेसमोर होते. भाजप त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यांना दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करता आली असती, असे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटनेते विश्वजीत बारणे यांनी सांगितले.

गटतट असल्याने भाजपात ताळमेळ दिसत नाही

चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत नगरसेवक आले. जणगणना त्यानंतर एसआयआर मोहिमेमुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना भेटत नाहीत. मोकाट कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना शहरात वाढल्या आहेत. रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतूक कोंडी भर पडत आहे.

आजच्या भूमिकेवरून सहा महिन्यांतच भाजप अधोगतीस जात असल्याचे दिसत आहे. महापौरांना सभा कामकाज करू दिले जात नाही. भाजपात अनेक गट असल्याने समन्वयाचा अभाव असल्याने ताळमेळ दिसत नाही. अजित पवार असताना महापालिकेत असा असंस्कृत कारभार नव्हता. स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय सभेपुढे रितसर आला असून, पुढील सभेत त्यावर निर्णय न झाल्यास तीव्र भूमिका घेऊ. येथे आमची महायुती नाही, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

सर्वसाधारण सभेचे कामकाज करण्याचा निर्णय पार्टी मीटिंगमध्ये झाला होता. मात्र, ऐनवेळी पक्षनेत्यांनी डायसवर येत सभा तहकूब करण्याची सूचना केली. वरिष्ठांचा निर्णय असल्याने सभा तहकूब करण्याची घोषणा मी केली. सभेसमोर शहरासंदर्भातील महत्त्वाचे विषय असल्याचे सभा कामकाज लवकरच घेण्यात येईल.
- रवी लांडगे, महापौर
वंदे मातरम‌् राष्ट्रगीताचा काँग्रेसने अवमान केला आहे. ही मोठी घटना आहे. त्याचा निषेध आम्ही केला आहे. शहरातील प्रश्न, समस्या व विकासकामाबाबत आम्ही नेहमीच सकारात्मक आहोत. त्यादृष्टीने आम्ही कामकाज करत आहोत. स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत तहकूब सभेत योग्य निर्णय घेतला जाईल.
- प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT