

पिंपरी: शहरासह परिसरात पाऊस, ढगाळलेले वातावरण, थंड वारे, गारवा या वातावरणातील बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात मलेरियाचे दोन, डेंग्यूचे १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, चिकुनगुनियाचे २ संशयित रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या १५ दिवसांत मलेरियाच्या १९०४८ संशयित रुग्णांपैकी २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर, डेंग्यूच्या ४३० संशयित रुग्णांपैकी १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे आणि शहरातील कचऱ्याच्या समस्येमुळे डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
शहरात २५९ घरांमध्ये आढळल्या डास अळ्या
डेंग्यू आणि इतर डासांपासून होणार्या आजारांस प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन साठविलेल्या पाण्याची तपासणी (कंटेनर तपासणी) केली जाते. १५ दिवसांत ३२ हजार ३५७ तपासलेल्या घरांमध्ये २५९ घरांमध्ये डास अळ्या आढळल्या आहेत.
डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेतर्फे वेळोवळी नागरी वस्तीमध्ये तपासणी केली जाते. तसेच, एखाद्या घरात डेंगीच्या अळ्या आढळल्या तर त्याला दंडदेखील आकारला जातो. आरोग्य विभागाकडून आठही क्षेत्रिय कार्यालयातून कंटेनर तपासणी अहवाल मागविला जातो.
पावसाळा संपला तरी अनेक खाचखचळ्यांमध्ये पाणी साचून रहाते. वेळीच स्वच्छता न झाल्याने त्यात डासांच्या अळ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो. घरामध्ये अडगळीच्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढतो. कचरा, अडगळीतील वस्तू त्यांचे आश्रयस्थान ठरतात आणि डेंग्यूचा फैलाव होतो.
शहरामध्ये झोपडपट्टीचे अधिक प्रमाण आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांच्या घरातही पाण्याच्या टाक्या यामध्ये पाण्याची साठवण केली जाते. घरोघरी जाऊन साठविलेल्या पाण्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाते. नागरवस्तीमध्ये भंगार सामान, टायर ट्यूब, कुलर यामध्ये पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष साठविलेल्या पाण्याची पाहणी केली जाते.
अनेक ठिकाणी रोगांना आमंत्रण देणारी अस्वच्छता व त्यामुळे निर्माण झालेली अनारोग्याची स्थिती, पाणी तुंबल्यामुळे दलदल, त्यामुळे डासांची होणारी उत्पत्तीही साथीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरते. तसेच, अशुद्ध, प्रदूषित हवा या परिस्थितीत भर घालते. परिणामी या महिन्यात कीटकजन्य आजार आणि साथीच्या आजारामुळे त्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
३२ हजार ३५७ घरांची तपासणी
ऑगस्ट महिन्याच्या अहवालामध्ये ३२ हजार ३५७ तपासणी केलेल्या घरापैंकी २५९ घरांमध्ये डास अळ्या आढळल्या आहेत. १ लाख ६७ हजार ४१८ कंटेनर तपासणीमध्ये २९३ कंटेनरमध्ये डास अळ्या आढळल्या. १०५ ठिकाणच्या बांधकामांची तपासणी करण्यात आली आहे. तर, १३८ जणांना नोटीस पाठविण्यात आली असून, २९ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.