पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे अशा विविध शैक्षणिक संस्थांसाठी अग्निसुरक्षा नोंदणी आणि अग्नी सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र (फायर सर्टिफिकेट) बंधनकारक आहे. संबंधित शैक्षणिक संस्थांनी अग्निशमन विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अधिकृत फायर सर्टिफिकेट घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सर्टिफिकेट नसल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.
कोणतीही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लास, अकादमी किंवा प्रशिक्षण केंद्र हे अग्निसुरक्षेच्या नियमांपासून मुक्त नाही. अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, फायर अलार्म प्रणाली तसेच, प्रशिक्षित कर्मचारी यांची उपलब्धता ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर महापालिकेमार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा उपाय असणे गरजेचे आहे. सर्व संस्थांनी निर्धारित नियमांचे पालन करावे. आपला व्यावसायिक वापर असलेला परिसर अग्नी सुरक्षित करणे व ठेवणे ही संबंधित संस्थाचालक व मालक यांची जबाबदारी आहे. शैक्षणिक संस्थेची नोंदणी व आवश्यक अग्नी सुरक्षितता उपाययोजना केल्यास गंभीर दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
महापालिकेने फायर सर्टिफिकेटकरिता तपासणी, नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. ही सुविधा noncoreerp. pcmcindia. gov. in/ login संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अग्निशमन विभागामार्फत यासंबंधी क्यूआर कोड प्रसिद्ध केला असून, तो स्कॅन करून आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी व सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी उपस्थित असतात. त्यांच्या सुरक्षेची हमी देणे ही शैक्षणिक संस्था चालक व मालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळेच नोंदणी आणि अधिकृत फायर सर्टिफिकेट प्रत्येक शैक्षणिक संस्थेने घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करून नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हे महापालिकेचे ध्येय आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.