पिंपरी: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याने त्या निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी (दि. 5) उठवण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ठप्प झालेले कामकाज शनिवारपासून (दि. 6) नियमितपणे सुरू होणार आहे.
विधान परिषदेचे आचारसंहिता 18 मे रोजीपासून लागू झाली होती. ती आचारसंहिता 25 जूनपर्यंत होती. त्या निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होणार होते. मतमोजणी 22 जूनला होणार होती. त्यानंतर 25 जूनला संपूर्ण निवडणूक प्रकिया पूर्ण होवून आचारसंहिता उठणार होती. आचारसंहिता लागल्याने महापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच, विविध विषय समितीच्या सभा रद्द झाल्या होत्या. परिणामी, महापालिकेत पदाधिकारी व नगरसेवकांची वर्दळ घटली होती.
मात्र, ती निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांच्याविरोधात एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने त्याची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आचारसंहिता शुक्रवारी संपुष्टात आणण्यात आली आहे. तसे आदेश उपमुख्यनिवडणूक अधिकारी विक्रम निकम यांनी काढले आहेत. त्यामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज शनिवारपासून (दि. 6) पूवर्वत सुरू होणार आहे. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सोमवारपासून (दि. 8) दैनंदिनक कामकाज जोमाने सुरू होईल, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
नियमित सभा होणार असल्याने नगरसेवकांमध्ये उत्साह
निवडणूक आचारसंहिता उठल्याने महापालिकेचे नियमित कामकाज जोमात सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी आचारसंहिता उठल्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा, विविध विषय समिती सभेचे कामकाज पुन्हा नव्या जोमाने सुरू होणार आहे. मात्र, निवडणूक न झाल्याने काही नगरसेवक खासगीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
सर्वसाधारण सभा 15 जूनला
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा 15 जूनला होणार आहे. सभेच्या पटलावर स्वीकृत दहा नगरसेवकांची निवड करणे, महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजनेवर (डीपी) सुनावणी घेण्यासाठी समितीची स्थापना करणे, मालमत्ताकर वसुलीसाठी शहरात अ, ब आणि ड असा तीन विभागाचे अ आणि ब असे नवीन दोन विभाग तयार करणे, पुनावळे येथील महापालिकेची 91 गुंठे जागा खासगी संस्थेला 30 वर्षांसाठी भाडे तत्वावर देणे हे चार विषय आहेत.
निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास आता कोणताही अडसर नाही. महापालिकेची मासिक, साप्ताहिक सभेचे कामकाज सुरू होते. मात्र, त्यात धोरणात्मक निर्णय घेतले जात नव्हते. आता सर्व सभा नियमितपणे घेतल्या जातील. स्थायी समितीची बुधवारी (दि. 10) सभा आहे. सर्वसाधारण सभा 15 जूनला आहे. त्याचे विषयपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.उल्हास जगताप, नगर सचिव, महापालिका