पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 हजार मनुष्यबळाची तयारी Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Election Manpower: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 हजार मनुष्यबळाची तयारी

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाचा धडाका; शिक्षक, सरकारी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांची मदत घेणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने निवडणूक विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुमारे 15 हजार अधिकारी, कर्मचारी लागणार आहेत. यासाठी महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक, राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी तसेच, अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागास कसरत करावी लागत आहे.(Latest Pimpri chinchwad News)

फेबुवारी 2017 नंतर सुमारे नऊ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणूक पारदर्शक वातावरणात तसेच, सुरळीत पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी फौज आवश्यक आहे. निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना तयार झाली आहे. आता विधानसभा मतदारसंघानुसार मतदार याद्या फोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या विविध कामकाजासाठी वर्ग एक ते वर्ग चारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार नियुक्त्या करण्यात येत आहेत.

सद्यस्थितीत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 301 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर, पुढे आणखी 15 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. निवडणुकीसाठी सुमारे 2 हजार 100 मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्र प्रमुख व सहाय्यक केंद्र प्रमुख असे चार कर्मचारी असतील. एक शिपाई असणार आहे. एका केंद्रावर पाच कर्मचारी असे एकूण 12 हजार 600 कर्मचारी नेमावे लागणार आहेत. त्याशिवाय 20 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, सुमारे 15 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज निवडणुकीसाठी लागणार आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून जुळवाजुळव केली जात आहे.

गरजेनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस सुरुवात

निवडणूक अधिकारी यांचे विशेष अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयासाठी तसेच सर्व प्रकारच्या कर्तव्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीसंदर्भात व्यवस्थापन, आचारसंहिता व्यवस्थापन, निवडणूक प्रशिक्षण, मतदान केंद्र तसेच स्थापत्य व विद्युत व्यवस्था, ईव्हीएम वितरण, वाहन अधिग््राहण, मतमोजणी आराखडा स्ट्राँग रुम व्यवस्थापन, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, स्विप व्यवस्थापन, निवडणूक खर्च व्यवस्थापन, कर्मचारी मानधन व मुशहिरा वाटप कक्ष, निवडणूक साहित्य व स्टेशनरी व्यवस्थापन, टपाल मतपत्रिका टपाली मतदान कक्ष, मतपत्रिका छपाई व वाटप कक्ष, विविध परवाना एक खिडकी योजना कक्ष, न्याय विधी कक्ष, कम्युनिकेशन प्लान, मतदार मदत केंद्र, मतदार सोयी सुविधा कक्ष, संगणकीय कामकाज कक्ष, बैठक नियोजन इतिवृत्त कक्ष, दूरसंचार सुविधा कक्ष यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गरजेनुसार ते त्या विभागात काम करीत आहेत. अत्यावश्यकतेनुसार काही विभागातील कर्मचारी संख्या कमी किंवा जास्त केली जाणार आहे.

अकरा निवडणूक निर्णय अधिकारी असणार उपजिल्हाधिकारी

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 11 उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे महापालिकेचे 3 प्रभाग असतील. त्या एका कार्यालयात 25 ते 30 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांचीही नेमणूक केली जाणार आहे.

मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन

महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विविध सेलनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 301 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुमारे 15 हजार कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक असतील. त्यानुसार, नियोजन सुरू आहे, असे महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT