Pimpri Chinchwad Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Election Political U-Turn: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; शेवटच्या क्षणी राजकीय ‘यू टर्न’, युतीत मोठी उलथापालथ

भाजपा–शिंदे शिवसेनेत बिघाडी, राष्ट्रवादीत अनपेक्षित आघाडी; शहरातील राजकारण तापले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार (दि. 3) चे केवळ चार तास शिल्लक असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अनेक राजकीय ‌‘यू टर्न‌’ पाहायला मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐनवेळी आघाडी झाली आहे. तर, भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अनपेक्षितपणे बिघाडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

निवडणुकीसाठी शहरात भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होणार असे जाहीर करण्यात आले होते. त्या संदर्भात बैठकाचे सत्र सुरू होते. युती लवकरच जाहीर होणार असे वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार तास शिल्लक असताना भाजपाने जागा दिल्याने तसेच, शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची अट घातल्याने युतीत बिघाडी झाल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे युतीच्या भरवशावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्याबाबत शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. भाजपाकडून सर्व 128 जागांवर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने सक्षम उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याचा सूचना देण्यात आले आहेत. मात्र, एबी फॉर्मची प्रतीक्षा अद्यापही कायम असल्याने अनेक उमेदवार गॅसवर आहेत.

आरपीआयला मिळाल्या पाच जागा

भाजपाची राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युती आहे. आरपीआयने भाजपाकडे 128 पैकी 15 जागांची मागणी केली होती. आरपीआयला भाजपाने शहरात 5 जागा सोडल्याचे समजते. त्यात नेहरुनगर, खराळवाडी, अजमेरा कॉलनी, प्रभाग क्रमांक 9, रावेत, मामुर्डी, किवळे प्रभाग क्रमांक 16, पिंपरी गाव, जिजामाता रुग्णालय, पिंपरी कॅम्प प्रभाग क्रमांक 21, वाकड, पुनावळे, ताथवडे प्रभाग क्रमांक 25 आणि दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक 30 या प्रभागातील अनुसूचित जाती (एससी) एका जागेचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत आरपीआयला भाजपाने 3 जागा दिल्या होत्या. यंदा दोन जागा वाढल्याने आरपीआयकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

घराणेशाहीला बसणार ब्रेक ?

आमदार, खासदारांच्या मुलांना व नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक लोकप्रतिनिधींना आपल्या मुलांना तसेच, जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळणार की नाही, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदिप खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री माजी नगरसेविका अनुराधा गोरखे या इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार का, यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून काही सांगण्यात आले नाही.

शिंदेची शिवसेना पडली एकटी

ऐनवेळी युती न झाल्याने राज्यात सत्तेमध्ये असणाऱ्या महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष एकटा पडला आहे. इतके दिवस सकारात्मक चर्चा सुरू असताना, मोक्याच्या वेळी युतीत बिघाडी झाल्याने पक्षाचे उमेदवार व समर्थक रोष व्यक्त करीत आहेत. सुडाच्या भावनेने भाजपाने आतापर्यंत नाहक खेळवत ठेवल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाचे बळ मिळणार नसल्याने एकट्या पडलेल्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा निशाणा लागणार की चुकणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला 20 जागा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याचे खुद्द अजित पवार यांनी तळवडे येथील जाहीर सभेत घोषित केले आहे. शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला केवळ 20 जागा सुटल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनेक पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा धडाका कायम ठेवला आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार आपआपल्या घड्याळ आणि तुतारी या चिन्हावर लढणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्यक्षात किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल.

ठाकरेची शिवसेना, काँग्रेस, मनसे आघाडीचेही ठरले

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी व घटक पक्षांची आघाडी झाली आहे. त्यात प्रत्येक पक्षाला किती जागा असतील, याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. उद्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

भाजपा विरोधात सर्वपक्षीय आघाडीसाठी प्रयत्न

भाजपाने ऐनवेळी राजकारण केल्याने शिंदे शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादी, काँग््रेास, ठाकरेंची शिवसेना, मनसे एकत्र येऊ शकतात. त्यासाठी बोलणी सुरू आहेत. भाजपाला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र ताकदीने लढा देण्यासाठी बोलचालींना वेग आला आहे. तसे, झाल्यास भाजपाला फटका बसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT