पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि. 15) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आजची ‘रात्र वैऱ्याची’ ठरण्याची शक्यता आहे. दिवसभरात उघड प्रचार संपला असला तरी मतदानाच्या आदल्या रात्री छुप्या प्रचाराला वेग येण्याची चिन्हे आहे.
अंधार पडताच पडद्यामागील हालचालींना गती मिळण्याची चिन्हे राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः काही संवेदनशील भागांत मतदारांना भूलवण्यासाठी पैशांचे वाटप, भेटवस्तू, जेवणाची व्यवस्था किंवा अन्य प्रलोभनांचे प्रकार घडू शकतात.
साम-दाम-दंडाचा वापर, वादाची शक्यता
रात्रीच्या अंधारात छुपा प्रचार करताना काही कार्यकर्त्यांकडून मसाम-दाम-दंड या मार्गांचा वापर केला जातो. घराघरांत जाऊन संपर्क साधणे, रात्री उशिरापर्यंत गटागटाने फिरणे, फोन कॉल्स, मेसेजेस किंवा थेट भेटीगाठी करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न आज रात्री अधिक तीव होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास वाद, शाब्दिक चकमक किंवा किरकोळ धक्काबुक्की होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आजची रात्र केवळ राजकीय डावपेचांसह पोलिसांसाठी तणावाचीही ठरणार असल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी वाढवली गस्त
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी शहरभर गस्त वाढवली असून, रात्रीच्या वेळी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनशील चौक, झोपडपट्टी परिसर, मुख्य रस्ते आणि दाट वसाहतींमध्ये पोलिसांचा वावर वाढवण्यात आला आहे. विशेष पथके, नाकाबंदी, वाहनतपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. आचारसंहिता भंग, रोख रक्कम वाटप किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून देण्यात आले आहे.
पैशांचा पाऊस ?
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यापूर्वीही मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांनी मपैशांचा पाऊसफ पाडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळांतून, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा दाट लोकवस्तीच्या परिसरात गुपचूप हालचाली झाल्याचे अनुभव प्रशासनाच्या नोंदीत आहेत. काही ठिकाणी मतदारांना थेट रोख रक्कम देऊन, तर काही ठिकाणी सूचक आश्वासने देत मत वळवण्याचे प्रयत्न झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाही अशा प्रकारांची शक्यता दाट असल्याने, झोपडपट्टी व संवेदनशील भाग पोलिसांच्या विशेष रडारवर आहेत.