पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. साप्ताहिक सुटी रविवार (दि. 11) असल्याने प्रभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. सर्वच उमेदवार संपूर्ण प्रभाग पिंजून काढत शक्तिप्रदर्शन करण्यावर भर देणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत 32 प्रभागांत एकूण 128 जागा आहेत. त्यापैकी 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. एकूण 126 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान गुरुवार (दि. 15) होणार आहे. प्रचार बुधवार (दि. 14) पर्यंत करता येणार आहे. अखेरचे पाच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने वेग घेतला आहे.
प्रचार अंतिम टप्पात पोहचल्याने उमेदवारांसह सर्मथकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. दैनंदिन कामे बाजूला ठेवून केवळ प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत. प्रचाराचा हा वेग आणि उत्साह आणखी वाढणार आहे. आज साप्ताहिक सुटीचा रविवार आहे. बहुतांश मतदार हे घरी असतात. त्यामुळे उमेदवार संपूर्ण प्रभागात पदयात्रा व रॅली काढून प्रभाग पिंजून काढतील. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी रविवारचा दिवस सार्थकी लावण्याचा उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नियोजन केले आहे. सकाळपासून रात्री दहापर्यंत प्रचार यंत्रणा राबवली जाईल. डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात येतील. त्यात उमेदवारांसह त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, आई-वडील, सासू-सासरे व नातेवाईक असे सर्वच मंडळी हिरीरिने सहभाग होत आहेत. सर्वांनी स्वतंत्र पथके तैनात करून प्रचार यंत्रणा सांभाळली आहे. पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, बैठका, मेळावा घेत प्रचाराचा धुराळा उडला जात आहे. रविवार सुटीनिमित्त सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक दिवसभरात संपूर्ण प्रभागात प्रचार यंत्रणा राबवली जाईल. त्यामुळे शहरातील सर्व 32 प्रभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, मंत्री, नेत्यांचा तोफा धडधडल्या
आत्तापर्यंतच्या निवडणूक प्रचारात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळाला आहे. भाजपाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे हे शहरात आले होते. त्यांच्या शहरभरात सभा झाल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात आठपेक्षा अधिक सभा घेत शहर पिंजून काढले आहे. तसेच, आमदार रोहित पवार यांनीही काही सभा घेतल्या आहेत. पवारांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना खिंडीत पकडले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, आमदार सचिन अहिर, प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा व मेळावे घेतले आहेत. बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शहरात दोन सभा घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रॅली घेतली. राज्यातील नेत्यांनी शहरात येऊन सभा गाजविल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे.
तब्बल 692 उमेदवार मैदानात
महापालिकेतील 128 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 126 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. भाजपाने 120 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कमळ चिन्हावर 5 जागा लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सर्वाधिक 124 जागेवर लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 57, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 48, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13, काँग्रेसचे 45, आम आदमी पार्टीचे 35, वंचित बहुजन आघाडीचे 29 आणि बहुजन समाज पार्टीचे 15 उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्याने काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. त्यासह स्वतंत्रपणे लढणारे अपक्ष उमेदवारांची संख्या 166 इतकी आहे.
मतदारांना साकडे
उमेदवार रिक्षा व टेम्पोद्वारे आपल्या चिन्हाचा प्रचार करीत आहेत. सकाळी 10 पासून रात्री दहापर्यंत या वाहनांवरील ध्वनिक्षेपकावरून प्रचार केला जात आहे. उमेदवारांचे चिन्ह मतदारांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रभागातील सर्व वस्त्या, कॉलनी, हाऊसिंग सोसायट्या, गल्ल्या, भाजी मंडई, चौक, बाजारपेठ आणि परिसरात वाहन फिरवून प्रचार करत आहे. तसेच, एलईडी व्हॅनद्वारे प्रभागात केलेल्या कामांची तसेच, पक्षाचे जाहीरनामा आदी माहिती दाखवली जात आहे.