पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी एकदाची फिक्स झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. नववर्षांच्या मुहूर्तावर प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, गुरुवार (दि. 1) पासून प्रभागात प्रचाराचा जोरदार माहोल पाहायला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली; मात्र पक्षांतराचे पेव फुटल्याने भाजपा, आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 30 डिसेंबरपर्यंत सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बंडखोरीचा फटका बसू नये, पक्षांनी खबरदारी घेतली. तोपर्यंत प्रत्येक उमेदवार गॅसवर होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले. एबी फॉर्म मिळताच उमेदवारांनी जल्लोष केला. दुपारी तीनपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एबी फॉर्म सादर करण्याची प्रत्येक उमेदवाराला अक्षरश: धावाधाव करावी लागली. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. उमेदवारी अर्जाची छाननी बुधवार (दि. 31) करण्यात आली. त्यात अर्ज वैध ठरल्याने प्रमुख उमेदवारांना हायसे झाले आहे. आता नववर्षाच्या मुहुर्तावर गुरुवारपासून प्रभागात प्रचाराचा धडाका लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी प्रभागातील कोणत्या भागातून रॅली काढायची, त्याचा मार्ग व इतर बाबी ठरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून संपूर्ण शहरात प्रचाराची रणधुमाळी दिसून येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे त्या प्रभागात त्या पक्षाचा उमेदवार कोण असणार, पक्ष कोणाला पुरस्कृत करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. त्यामुळे ते त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासह इतर काही पक्षांचे व अपक्षांचे उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. पक्षाचा अधिकृत उमेदवार बाद झाल्याने त्या पक्षांवर नामुष्की ओढवली आहे. त्या प्रभागात कोणाला पुरस्कृत करायचे, का प्रतिस्पर्धी पक्षाला बाय द्यायचा, त्यावरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खल सुरू आहे.
भाजपाचे रवी लांडगे पुन्हा बिनविरोध ?
भोसरीतील धावडेवस्ती, गुळवेवस्ती प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपाचे उमेदवार रवी लांडगे हे पुन्हा बिनविरोध निवडून आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले होते. रवी लांडगेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. मनसेचे उमेदवार नीलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र नसल्याने बाद करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा अर्ज आला नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न राहिल्याने रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आल्याचे सांगितले जात आहे; मात्र रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून त्या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तर, पिंपरी गाव, जिजामाता रुग्णालय, पिंपरी कॅम्प प्रभाग क्रमांक 21 मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश ढाकणे यांच्या विरोधात आक्षेप घेतला होता. त्यांचे नाव पिंपरी-चिंचवडसह इतरही मदार यादीत असून, दुबार नाव असल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्याचा आक्षेप नोंदविला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो आक्षेप फेटाळून लावला.
शिवसेनेसह अपक्षांचे अर्ज बाद
प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये अपक्ष उमेदवार पूजा राजेंद्र सराफ यांचा अर्ज बाद झाला आहे. प्रभाग 4 मध्ये गौरी प्रमोद शेलार यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्र नसल्याने बाद झाला आहे. प्रभाग 4 मध्येच रुपाली संदीप डोळस यांचा अर्ज डिपॉडिट भरले नसल्याने आणि विमल दिलीप दंडवते यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये दिनेशसिंग परदेशी यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदकांचे मतदार यादीतील क्रमांक नसल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये पिंटू पमेश्वर प्रसाद यांचे वय 21 वर्षे पूर्ण नसल्याने त्यांचा अर्ज बाद केला आहे. युवराज रामू राठोड यांचे मतदार यादीत नाव नसल्याने त्यांचा प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पक्षाचे प्रभाग क्रमांक 30 मध्ये नीलेश हाके आणि प्रभाग क्रमांक 29 मधील पौर्णिमा अमराव यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सूचक व अनुमोदक हे एकच असल्याने अर्ज बाद करण्यात आला आहे.
शुक्रवार दुपारी तीनपर्यंत उमेदवारी माघारीची संधी
पक्षाने तिकीट न दिल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. दुसऱ्या पक्षातून तसेच, अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या बंडखोऱ्यांना शांत करून तसेच, समजूत काढून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी शहराध्यक्षांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मनधरणी करण्यात येत आहे. स्वीकृत नगरसेवक, क्षेत्रीय समिती सदस्य, पक्षाचे पद तसेच, इतर समित्यांवर संधी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांना दिले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यामागे पदाधिकाऱ्यांकडून सतत तगादा लावण्यात आला आहे. तर, काही बंडखोरांनी आपले मोबाईल बंद करून संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यात किती यश मिळते हे शुक्रवारपर्यंत कळणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याची मुदत गुरुवार (दि. 1) आणि शुक्रवार (दि. 2) असे दोन दिवस आहे. शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
एबी फॉर्म नसल्याने अर्ज बाद ?
थेरगाव, गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) काही उमेदवारांना मुदतीमध्ये पक्षाचा एबी फॉर्म सादर करता आला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निवडणूक विभागाकडून रात्री उशिरापर्यंत त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मंगळवारी (दि.30) दुपारी तीनपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म सादर केला नाही म्हणून भाजपाचे उमेदवार गणेश गुजर, शालिनी कांतीलाल गुजर, करिश्मा बारणे आणि शिवसेनेचे रुपाली गुजर व अनिकेत प्रभू यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, त्याबाबत निवडणूक विभागाकडून अधिकृत सांगण्यात आलेले नाही.
..असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज माघारीचा कालावधी - 1 व 2 जानेवारी - सकाळी 11 ते दुपारी 3
चिन्ह वाटप - 3 जानेवारी
उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी - 3 जानेवारी
मतदान - 15 जानेवारी - सकाळी 7.30 ते 5.30
मतमोजणी - 16 जानेवारी - सकाळी 10 पासून
निकाल राजपत्रात प्रसिद्धी - 19 जानेवारी