PCMC Election Criminals Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Election Criminals: पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ७३ 'भाई-दादां'चा सहभाग? राजकीय आश्रयामुळे गुन्हेगारीला खतपाणी!

पोलिसांच्या छाननीत धक्कादायक वास्तव उघड, अनेक सक्रिय गुन्हेगार मोठ्या पक्षांशी संबंधित; गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची पोलिसांची तयारी.

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात शहरातील तब्बल 73 सक्रिय गुन्हेगार मोठ्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून या गुंडांच्या हालचालीवर बारकाईने ‌‘वॉच‌’ ठेवण्यात येत आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपशीलवार यादी तयार केली आहे. या यादीत खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, आर्थिक गुन्हे आणि टोळीविरोधी कायद्यांतर्गत नोंद असलेले काही आरोपीही आहेत. विशेष म्हणजे, यांपैकी काही गुन्हेगार मोठ्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे.

निवडणुका पारदर्शक ठेवण्याचे आव्हान

महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच समोर आलेल्या या आकडेवारीने राजकारणातील गुन्हेगारीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पोलिसांसमोर गुन्हेगारीवर अंकुश ठेवून निवडणुका पारदर्शक ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

वरदहस्तामुळे खतपाणी

गुन्हेगारी आणि राजकीय नेतृत्वाचे नाते ही नवीन बाब नाही; मात्र निवडणूक काळात ही बाब प्रकर्षाने समोर येते. काही गुन्हेगार रॅली, ताकदप्रदर्शन, प्रचार वाहनांची व्यवस्था, बूथनिहाय संपर्क, विरोधकांना दबावाखाली ठेवणे, मतदारांवर दहशत निर्माण करणे अशा भूमिका बजावतात. या बदल्यात राजकीय मंडळी त्यांचे संरक्षण करतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते. गुन्हे दाखल झाले तरी त्यांना त्वरित जामीन मिळतो. काहींच्या विरोधातील कारवाई राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षानुवर्षे लांबते. यामुळे शहरातील स्वच्छ प्रशासन, शिस्त आणि सुरक्षितता यावर गंभीर परिणाम होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

शहराची प्रतिमा मलिन?

राजकीय वरदहस्तामुळे गुन्हेगारी वाढू शकते. ज्यामुळे शहराची उद्योगनगरी अशी मलिन होऊ शकते. सुरक्षिततेचे वातावरण ढासळल्यास शहरातील गुंतवणुकीवरही परिणाम होऊ शकतो, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

गुन्हेगारीचा ट्रेंड

राजकीय वरदहस्त मिळाल्याने निवडणूक काळात मतदारांवर दबाव टाकला जातो. गुन्हेगारांना मिळणाऱ्या ग्लॅमरमुळे तरुण पिढी राजकारणातील चुकीच्या वाटेकडे ओढली जाते. गुन्हेगारीतील व्यक्ती राजकारणात पुढे येताना दिसल्याने युवकांमध्ये भ्रम निर्माण होतो आणि ‌‘दादागिरी‌’ला प्रतिष्ठा समजण्याची चुकीची प्रवृत्ती वाढू लागते.

दोनपेक्षा जास्त गुन्हे असूनही इच्छुक

या वर्षीच्या महापालिका निवडणुकीत इच्छुक असलेल्या काही उमेदवारांवर दोन किंवा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये काहीजणांवर खंडणी, मारहाण, सरकारी कामात अडथळा, अवैध जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेले गुन्हे आणि आर्थिक वादातून दाखल असलेल्या तक्रारी यांचा समावेश आहे.

पक्षश्रेष्ठींची भूमिका महत्त्वाची

तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत पक्षश्रेष्ठींनी स्वच्छ प्रतिमा, सभ्य वर्तन आणि कायदेशीर स्थितीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. अलीकडच्या काळात फौजदारी नोंद असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचे धोके वाढत आहेत. अशा व्यक्ती जर सत्तेत आल्या तर कायदा-सुव्यवस्था कोण सांभाळणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांची सर्वोतोपरी तयारी

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणुकीपूर्वीच संवेदनशील प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारांची हालचाल, आर्थिक व्यवहार, सभासमारंभातील उपस्थिती, राजकीय कार्यक्रमांतील सहभाग आणि स्थानिक वादांमध्ये हस्तक्षेप यांचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे. आवश्यकतेनुसार सीआरपीसी, एमपीडीए, आणि काही प्रकरणांत मोक्का सारखी कडक कारवाई करण्याची तयारीही करण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीकडून दबाव तंत्र वाढू नये, यासाठी प्रभागनिहाय सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपशीलवार छाननी सुरू आहे. यामध्ये काही गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. असे असले तरीही कायद्यापुढे कोणालाही सूट मिळणार नाही. शहरातील मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे.
डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT