पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 ला होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनासह इच्छुकांकडून जोरात तयारी सुरू आहे. चार सदस्यीय 32 प्रभागांत मतांचा पाऊस पडणार आहे. कारण एक मतदार चार मते टाकणार आहे. त्यामुळे तब्बल चौप्पट मते मोजावी लागणार आहेत.
फेब्रुवारी 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीप्रमाणे तब्बल 9 वर्षांनंतर आता निवडणूक होत आहे. त्या वेळेप्रमाणेच यंदा चार सदस्यीय 1 ते 32 प्रभाग आहेत. एकूण 128 जागा आहेत. तर, सन 2011 ची 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. सध्या शहराची अंदाजे लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे आहे. सध्या शहरात एकूण 17 लाख 13 हजार 891 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 9 लाख 5 हजार 728, महिला मतदार 8 लाख 7 हजार 966 आणि तृतीयपंथी 197 मतदार आहेत. त्यातील एक लाखापेक्षा अधिक मतदार हे दुबार आहेत.
जानेवारी 2026 ला महापालिकेची निवडणूक होणार आहे. एक प्रभाग चार सदस्यांचा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मते द्यावी लागणार आहेत किंवा तो नोटाला मतदान करू शकतो. एक मतदार चार मते टाकणार असल्याने मतांची संख्या चौपट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांवर म्हणजे राजकीय पक्षांवर मतांचा पाऊस पडणार आहे. दरम्यान, एकाच वेळी चार उमेदवारांना मते देताना अशिक्षित तसेच, ज्येष्ठ नागरिक तसेच, काही मतदारांचा संभ्रम आणि गोंधळ उडून, फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समस्यांबाबत मतदारांना घ्यावी लागणार चार नगरसेवकांची भेट
महापालिकेचा चार सदस्यीय एक प्रभाग आहे. त्यामुळे एका प्रभागात चार नगरसेवक असणार आहेत. त्यात दोन नगरसेविका असतील. आपल्या प्रभागातील तक्रारी, समस्या व अडचणी सोडविण्यासाठी संबंधित मतदाराला चारही नगरसेवकांची भेट घ्यावी लागणार आहे. चारही नगरसेवक एका पक्षाचे तसेच, त्यांच्यात ताळमेळ असल्यास मतदारांचे काम एकाच नगरसेवकाला भेटल्यानंतर होईल. मात्र, तसे नसल्यास मतदारांना चारही नगरसेवकांना शोधत फिरावे लागणार आहे.
फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीच्या वेळेस शहरात एकूण 11 लाख 92 हजार 89 मतदार होते. त्यापैकी 65.35 टक्के मतदान झाले होते. शहरातील एकूण 7 लाख 7 हजार 79 हजार 60 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात पुरुष मतदार 4 लाख 20 हजार 547 आणि महिला मतदार 3 लाख 58 हजार 506 होते. तर, तृतीयपंथी 7 मतदारांनी मतदान केले होते. यंदा मतदानाचा टक्का वाढणार की घसरणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
शहरभरात मतदार जनजागृतीवर भर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील सर्व मतदारांनी मतदान करावे. आपल्या मतदानाचा हक्क बजावावा म्हणून महापालिकेच्या स्वीप कक्षाकडून आत्तापासूनच जनजागृती केली जात आहे. कार्यक्रम, मेळावा, स्पर्धा, स्नेहसंमेलन, उपक्रम तसेच, महाविद्यालय, कंपन्या, बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृह अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मतदान करण्याची शपथ दिली जात आहे. जनजागृतीपर पथनाट्य सादर केले जात आहेत. तसेच, विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.