पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांमध्ये विजय-पराभवाचा फैसला अत्यंत कमी मतांच्या फरकाने झाला. काही ठिकाणी काही शेकडो मतांनी उमेदवार विजयी ठरले, तर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार, अपक्ष तसेच ‘नोटा’ला देखील विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या फरकाच्या मतापेक्षा जास्त मते असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे.
प्रभाग 8 मधून भाजपच्या सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सीमा सावळे यांचा 256 मतांनी पराभव केला. मात्र, शिंदेसेनेचे महेंद्र सरवदे 1598 मते आहेत. याचप्रमाणे प्रभाग 32 मधून प्रशांत शितोळे यांनी भाजपकडून 290 मतांनी विजय मिळवला. तिथे अतुल शितोळे यांचा पराभव झाला. तर मनसेचे राजू सावळे यांना 1025 मते मिळाली आहेत.
प्रभाग 23 मध्ये राष्ट्रवादीच्या योगिता बारणे (439) आणि प्रभाग 30 मध्ये प्रतीक्षा जवळकर (500) यांचे विजयही अत्यंत निसटते ठरले. या दोन्ही ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी हजारोंच्या संख्येत मते घेतली. प्रभाग 31 मध्ये भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर जगताप 523 मतांनी विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप पराभूत झाले. अपक्ष सागर परदेशी यांना 6126 मते पडली. प्रभाग 27 मधून सागर कोकणे यांचा 600 मतांचा विजय झाला आणि तर प्रभाग 13 मधून उत्तम केंदळे यांचा 607 मतांचा विजयही मतदारांच्या थोड्याशा कलावर ठरल्याचे दिसते.
भीमाबाई फुगे (734) आणि दीप्ती कांबळे (745) यांच्या लढतीत ‘नोटा’ला मिळालेली मते विजयाच्या फरकापेक्षा जास्त ठरली. तर तुषार सहाणे यांनी भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांचा 790 मतांनी पराभव केला.
प्रभाग 19 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सारखीच मते
प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादीच्या सविता आसवानी यांनी भाजपच्या जयश्री गावडे यांचा अवघ्या 21 मतांनी पराभव केला. मात्र, या लढतीत अपक्ष कविता शैलेंद्र मोरे (3,242) आणि पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीच्या अनिता भंडारे (2,648) यांना मिळालेली मते मिळाली आहेत. मंदार देशपांडे यांनी भाजपकडून 315 मतांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादीचे काळुराम पवार यांचा पराभव झाला. या ठिकाणी पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीचे जीतू पहलानी (5,446) यांना मते मिळाली. या प्रभागात राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना जवळपास सारखीच मते मिळाली आहेत.
..यांना मिळाले सर्वाधिक मताधिक्य
भाजपचे नितीन काळजे यांनी तब्बल 19 हजार 653 मतांचे मोठे मताधिक्य मिळवत शहरातील सर्वांत मोठा विजय नोंदवला आहे. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे संदीप वाघेरे (16,430), भाजपचे सचिन तापकीर (16,229), सारिका गायकवाड (16,011), राहुल कलाटे (14,896), स्नेहा कलाटे (14,349), रेश्मा भुजबळ (14,257), श्रुती डोळस (13,574), हिराबाई घुले (12,992), अर्चना सस्ते (12,919), शैलजा मोरे (12,866), विनायक गायकवाड (12,784) आणि कुणाल वाव्हळकर (12,707) यांनीही पाच आकडी मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी यांनी 12,139 मतांनी विजय मिळवत पक्षासाठी महत्त्वाची जागा राखली.