पिंपरी: पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील जागेत प्रस्तावित केलेले पोलिस स्टेशन, बस टर्मिनल, म्युन्सिपल पर्पज या आरक्षणाबाबत दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.4) सुनावणी घेण्यात आली. तब्बल 2 हजार 500 जणांना नोटीसा देऊनही केवळ 123 जण प्रत्यक्ष हजर होते. हरकतदारांचा प्रतिसाद कमी असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजना आराखड्यावर (डीपी प्लॅन) प्राप्त झालेल्या तब्बल 56 हजार 771 हरकतींवर सोमवारपासून (दि.3) सुनावणी घेण्यास आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृह येथे सुरुवात झाली आहे. आज दुसर्या दिवशीही पिंपरी भागातील आरक्षणावर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणीसाठी मोबाईल, मेल तसेच, पत्राद्वारे एकूण 2 हजार 500 जणांना नोटीसा पाठवण्यात आल्याचा दावा विशेष नियोजन विभागाने केला आहे. मात्र, आज प्रत्यक्षात केवळ 123 जण उपस्थित राहिले. तर, पहिल्या दिवशी फक्त 220 नागरिक हजर होते. डीपीतील पिंपरी चौकातील भीमसृष्टीबाबत सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक भीमसृष्टी शेजारील मैदान सर्व्ह क्रमांक 2/20 पोलिस स्टेशन आणि 2/21 मध्ये बस टमिनलचे प्रस्तावित आरक्षण आहे. तसेच, म्युन्सिपल पर्पज आरक्षण आहे. ते आरक्षण रद्द करावे, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. सुनावणी समितीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सुनावणीस समितीचे सात सदस्य तसेच, विशेष नियोजन विभाग, नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गैरहजर हरकतदारांना अखेरच्या दिवशी संधी
पिंपरी भागातील वेगवेगळ्या प्रस्ताविक आरक्षणाबाबत सध्या सुनावणी सुरू आहे. या भागाची सुनावणी 14ऑगस्टपर्यंत चालणार आहे. नोटीस प्राप्त होऊनही ज्यांना उपस्थित राहता आला नाही. उशीर झाला. अशा नागरिकांना शेवटच्या दिवशी 14 ऑगस्टला उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक भागातील सुनावणी झाल्यानंतर अखेरच्या दिवशी गैरहजर असलेल्या हरकतदार नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे. संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर गैरहजर नागरिकांना पुन्हा संधी दिली जाणार आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.