Divyang  Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Divyang Bhavan: पिंपरीतील ‘दिव्यांग भवन’मुळे डिजिटल शिक्षणाची नवी दारे खुली

आधुनिक सॉफ्टवेअर व डिजिटल ग्रंथालयामुळे दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास वाढला; शिक्षण-रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‌‘दिव्यांग भवन‌’ या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना डिजिटल शिक्षण व वाचनाची नवी दारे उघडली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दिव्यांगांना पुस्तके, अभ्यासक्रम आणि अवांतर साहित्य वाचणे सोपे झाले आहे. विविध सॉफ्टवेअर आणि उपकरणांचा वापर करून दिव्यांग बांधवांना वाचनाची आवड जोपासता येणे शक्य झाले आहे.

पिंपरीतील मोरवाडी येथील दिव्यांग भवनाच्या माध्यमातून केवळ वाचन सुलभ झाले नाही, तर दिव्यांग बांधवांच्या आत्मविश्वासातही वाढ झाली आहे. डिजीटल ग्रंथालय व आधुनिक सॉफ्टवेअरमुळे आता दिव्यांग नागरिक शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधींकडे वाटचाल करत आहेत.

आताच्या स्पर्धेच्या युगात दिव्यांग बांधवांनीही इतरांप्रमाणे डिजीटल शिक्षण घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या ‌‘दिव्यांग भवन‌’च्या माध्यमातून विविध सॉफ्टवेअरद्वारे प्रशिक्षण सुरू केले आहे. दिव्यांगांना डिजीटल ग्रंथालयामध्ये विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपली वाचनाची आवड जोपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येणे शक्य झाले आहे.

दिव्यांग भवनचा प्रवास

  • 1 फेब्रुवारी 2024 रोजी या भवनाची स्थापना झाली.

  • दिव्यांग भवन फाऊंडेशनला दिव्यांग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून समुदाय आधारित पुनर्वसन प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली.

  • 8 ऑगस्ट 2024 पासून प्रत्यक्ष सेवासुविधांना प्रारंभ.

  • सध्या येथे 45 कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी 11 जण दिव्यांग आहेत.

उपलब्ध सुविधा, सॉफ्टवेअर

  • माउस वेअर सॉफ्टवेअर : हात नसलेल्या दिव्यांगांसाठी डोक्याच्या हालचालीवर आधारित माउस नियंत्रणाची सुविधा.

  • ज्योती एआय रिडर : दृष्टी नसलेल्या बांधवांसाठी स्कॅनर मशीनद्वारे कागदातील माहिती ऑडिओ स्वरूपात उपलब्ध.

  • ब्रेल डिस्प्ले मशीन : ब्रेल भाषेत वाचनाची सुविधा देणारे अत्याधुनिक उपकरण.

धर्मग्रंथ ते स्पर्धा परीक्षांची पुस्तके

दिव्यांग बांधवांसाठी ग्रंथालयात पहिली ते बारावी पर्यंत ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा, धार्मिक ग्रंथ इतर अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध आहेत.

कमी दृष्टीसाठी सुविधा

  • ठळक अक्षरांचा की-बोर्ड

  • संगणकावर झूम सॉफ्टवेअर

  • गळ्यात अडकविणारे भिंग व टेबल भिंगाची सुविधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT