पिंपरी: शहरासह परिसरात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळलेले वातावरण, थंड वारे, गारवा या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीमध्ये मलेरियाचा एक, तर डेंग्यूचे ११ पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जुलै महिन्यामध्ये मलेरियाच्या २९, १०३ संशयित रुग्णांपैकी १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. तर डेंग्यूच्या ४२८ संशयित रुग्णांपैकी ११ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यामध्ये डेंग्यूचे २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि शहरातील कचऱ्याच्या समस्येमुळे डांस उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
पर्यावरणातील या बदलामुळे प्रकृतीत असंतलून निर्माण होवून काही नागरिक ताप, डोके दुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे आदी आजारांना वाढले असल्यामुळे दवाखाने रुग्णालयात नेहमीपेक्षाही फुल्ल गर्दी दिसत आहे. पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे उघड्या गटारातून वाहणारे पाणी, माश्या, मच्छर, दुर्गंधीमुळे जंतुसंसर्गाने होणार्या आजारात वाढ झाली आहे.
तसेच शहरामध्ये उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये जुलाबाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. हवेच्या माध्यमातून होणार्या संसर्गाने ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे. त्यात बालकांची संख्या लक्षणीय असून, वातावरणातील बदलामुळे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे लहान बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
ढगाळ वातावरणामुळे वाताच्या रुग्णही अंगदुखी या सारख्या व्याधीने ग्रस्त झाले आहेत. महापालिकेव्दारे किटकजन्य आजार जसे मलेरिया डेंग्यू होऊ नये यासाठी शाळा, वस्त्या याठिकाणी जनजागृती केली जात आहे. तरी नागरिकांनी बदलत्या वातावरणात कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.