

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे व गहुंजे ही सात गावे समाविष्ट केली जाणार आहे. तसेच, येत्या पाच वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल ५७ लाखांपर्यंत जाऊन पोहचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी, शहराचा कचरा दुप्पटीपेक्षा अधिकने वाढणार आहे, असा दावा महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात करण्यात आला आहे. मात्र, त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाचे नियोजन नसल्याने कचरा समस्या पेटण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेली ती सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय १० फेब्रुवारी २०१५ च्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगररचना व विकास विभागाकडे ३ जून २०१५ ला पाठविण्यात आला. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) ३१ मार्च २०१५ ला स्थापना झाल्याने ती गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास राज्य शासनाने नकार दिला होता. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ५ फेब्रुवारी २०१८ ला पुन्हा सुधारित ठराव मंजुर केला. तो फेरप्रस्ताव ५ एप्रिल २०१८ ला शासनाकडे पाठविण्यात आला. महापालिकेच्या प्रस्तावावर शासनाने अनेकदा माहिती मागविली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याबाबत नोव्हेंबर २०२० ला अभिप्राय मागविला गेला. ती सात गावे महापालिकेत लवकरच समाविष्ट होणार असे संकेत दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेकदा दिले होते.
त्याबाबत महापालिकेच्या पर्यावरण अहवालात पिंपरी-चिंचवड हद्दीत समाविष्ट होणारी गावे अशी शीर्षक देऊन त्या सात गावांची नावे व सन २०११ ची लोकसंख्या दिली आहे. तर, शहराची सन २०२१ ची लोकसंख्या सुमारे ३१ लाख ३० हजार ६४८ इतकी धरण्यात आली आहे. शहरात वेगात होत असलेले नागरीकरण लक्षात घेऊन, येत्या पाच वर्षांत म्हणजे सन २०३१ पर्यंत शहराची लोकसंख्या ५७ लाख ५ हजार ९७० होणार असल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे शहराचा कचरा दुप्पटीपेक्षा अधिकने वाढणार आहे. त्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच, क्षमता संपलेल्या मोशी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने पावले उचलून नियोजन करण्यात आलेले दिसत नाही. परिणामी, भविष्यात शहरातील कचरा समस्या पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहराच्या सीमा विस्तारल्याने कचराही वाढणार
पिंपरी-चिंचवड शहरात त्या सात गावांचा समावेश होणार आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा नागरी भाग महापालिकेस जोडला जाणार आहे. तसेच, पुणे महापालिकेत असलेला बोपखेल, कळस व दिघीचा उर्वरित भागही महापालिकेस जोडला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची सीमा विस्तारणार आहे. तसेच, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात फुगणार आहे. एकूण ५६.७२ चौरस किमी. पिंपरी-चिंचवडचे क्षेत्रफळ १८१ चौरस मीटर आहे. तीन गावे समविष्ट झाल्यास एकूण ५६.७२ चौरस किलोमीटरचे क्षेत्र वाढणार आहे. त्यावेळी पिंपरी-चिंचवडचे एकूण क्षेत्रफळ २३७.७२ चौरस किलोमीटर होणार आहे. शहरात सध्या दररोज १ हजार ५०० टन कचरा जमा होता. नवे भाग तसेच, वाढत्या लोकसंख्येमुळे कचर्याचे दैनंदिन संकलनही दुप्पटीपेक्षा अधिक होणार आहे.
शहरात सर्वाधिक प्लास्टिक कचरा
शहरातून सध्या जमा होणार्या कचर्यात सर्वाधिक ३०.८० टक्के इतके घरगुती ओला कचर्याचा समावेश आहे. कुरकुरे, वेफर्स, बिस्किटे, चॉकलेट्स, चहापूड व दुधाचे पाऊच यासाठी वापरल्या जाणार्या मल्टीलेयर्ड प्लास्टिक कचर्याचे प्रमाण २८.०६ टक्के आहे. उच्च क्षमता पॉलिथिनचे प्रमाण ३.९६ टक्के आणि कमी क्षमतेचा पॉलिथिन कचर्याचे प्रमाण ०.३४ टक्के आहे. कागदाच्या कचर्याचे प्रमाण ११.७४ टक्के आहे. कापडाचे प्रमाण ७.१९ टक्के, सॅनिटरी नॅपकिन्सचे प्रमाण २.९३ टक्के आणि घरगुती घातक कचर्याचे प्रमाण ०.५३ टक्के आहे. विटा,खडी,काँक्रीट, सिमेंटचा चुरा, रेती, माती या निष्क्रिय कचर्याचे प्रमाण ०.९४ टक्के आहे. गोणी पिशव्यांचे प्रमाण ०.९६ टक्के, नारळ्याच्या शेंड्या, लाकडाचे प्रमाण ९.०९ टक्के, चामड्याचे प्रमाण १.२९ टक्के, सिरेमिकचे प्रमाण ०.७३ टक्के, अलॉय धातूचे प्रमाण ०.१६ टक्के, काचांचे प्रमाण ०.२२ टक्के, स्पंजचे प्रमाण ०.६९ टक्के, धातूचे प्रमाण ०.११ टक्के आणि थर्माकोलचे प्रमाण ०.१२ टक्के इतके आहे, अशी आकडेवारी पर्यावरण अहवालात देण्यात आली आहे.
वर्षभरात जमा झाला साडेपाच लाख टन कचरा
पिंपरी-चिंचवड शहरातून वर्षभरात तब्बल ५ लाख ५० हजार २६८.४६ मेट्रिक टन कचरा जमा झाला आहे. एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत इतका मोठ्या प्रमाणात कचरा मोशी डेपोपर्यंत पोहचला आहे. त्यातील तब्बल ३ लाख ८६ हजार ७०३.१५ टन सुका कचरा डेपोत डंप करण्यात आला आहे. ओल्या कचर्याचे प्रमाण ८९ हजार ८९०.०३ टन इतके आहे. मिश्र कचरा ४९ हजार ३२.०७ टन, हिरवा कचरा १३ हजार ९६४.४५ टन मंडई कचरा ४ हजार ७८८.८७ टन, चिकन कचरा ५ हजार ८८८.७२ टन आणि घातक कचरा १.१६ टन आहे. शहरात निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण दरडोई प्रतिदिन सुमारे ४०७ ग्रॅम इतके आहे.
पर्यावरण विभागाने वाढवला तब्बल १ लाख ५ हजार टन कचरा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील संपूर्ण कचर्याचे संकलन केले जाते. तो कचरा मोशी कचरा डेपोत आणून टाकला जातो. त्या कचर्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाची आहे. परिणामी, मोशी कचरा डेपोची संपूर्ण जबाबदारी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार संपूर्ण शहरातून एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षात एकूण ५ लाख ५० हजार २६८.४६ मेट्रिक टन कचरा जमा झाला आहे. तर, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून या वर्षभरात तब्बल ६ लाख ५६ हजार ४०.७२ मेट्रिक टन कचरा जमा झाल्याचा दावा पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे. वाढलेला १ लाख ५ हजार ७७२.२६ मेट्रिक टन कचरा कोठून आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकार्यांच्या टक्केवारीसाठी की ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी कचर्याचे वजन वाढवले, अशी शंका उपस्थित केली जात आहे.