पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीनंतर आता 128 नवनिर्वाचित नगरसेवक पालिकेच्या सभागृहात प्रवेश करतील. त्यातील अनेक नगरसेवकांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे, तर काहींनी दहावी, अकरावी व बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहेत.
तसेच काही नगरसेवक पदवीधर, डॉक्टर, वकील, अभियंते आहेत. हे सर्व नवनिर्वाचित मंडळी आपआपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी पालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत. महापालिकेच्या विविध योजना व प्रकल्प प्रभागात राबविण्यासाठी पुढाकार घेतील.
महापालिकेच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या 128 नगरसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेची आकडेवारी पाहिली असता, महापालिका सभागृह हे शिक्षणाच्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ ठरले आहे. महापालिका सभागृहात चौथी उत्तीर्ण नगरसेवकांपासून ते डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक व पदव्युत्तर पदवीधारकांचा समावेश आहे. कमी शिकलेल्यांपासून उच्चशिक्षित नगरसेवक आहेत. कमी शिकलेले असलेले तरी, त्यांचा सामाजिक व विधायक कार्याचा वारसा तसेच, अनुभव मोठा असल्याचे सांगितले जात आहे.