PCMC Palkhi Route Cleaning Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Palkhi Route Cleaning: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’; पालखी मार्गावरून ५२ टन कचरा संकलित

पालख्या पुण्याकडे रवाना होताच महापालिकेची तातडीने स्वच्छता मोहीम; संत तुकाराम मार्गावर २८ तर ज्ञानेश्वर मार्गावर २४ टन कचरा जमा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा पुणे शहराकडे मार्गस्थ झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तात्काळ सफाई अभियान राबवण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्ते लगोलग चकाचक झाले. या मोहिमेत तब्बल 52 टन कचरा जमा करण्यात आला आहे.

वारीदरम्यान शहरात मोठ्या संख्येने येणार्‍या वारकरी बांधवांच्या सुविधा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गावर तात्पुरती स्वच्छतागृहे, स्नानगृहे तसेच, आवश्यक स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण व देखभाल आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या होत्या.

या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचार्‍यांनी सलग काम करत पालखी मार्ग स्वच्छ ठेवला. विविध स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाल्यानंतर लगोलग रस्ते स्वच्छ करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी मार्गातून अंदाजे 28 टन कचरा जमा करण्यात आला. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर अंदाजे 24 टन कचरा जमा करण्यात आला. तेथील कचरा जमा करून तो वाहनांद्वारे मोशी कचरा डेपोत पाठवण्यात आला.

सीवायडीए, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नमेंट, ईसीए, प्रतिभा कॉलेज, संजीवनी स्वयंसेवी संस्था, अंकुश फाउंडेशन, ज्ञानगंगा फाउंडेशन, अल्फा फाउंडेशन, पिंपरी- चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हाळसाकांत विद्यालय, ह्यूमन राईट्स असोसिएशन, संत निरंकारी मंडळ, निर्मल वारी, यशस्वी ग्रुप, आरंभ महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट, पिंपरी चिंचवड संस्था, निर्मल फ्लॉवर फाउंडेशन, लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन, उमंग फाउंडेशन, गुणवंत कामगार मंडळ, पितृछाया ट्रस्ट आणि एसएनबीपी महाविद्यालय आदी संस्थांनी या मोहिमेत सहकार्य केले.

स्वच्छ वारी, सुंदर वारी हा संदेश

वारीनंतर पालखी मार्ग आणि परिसराची तातडीने स्वच्छता करून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. या उपक्रमातून महापालिकेने स्वच्छ वारी, सुंदर वारी हा संदेश प्रभावीपणे दिला, असे महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT