Tug-of-war Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC City Engineer Vacancy: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता पद तीन महिन्यांपासून रिक्त; वर्णीसाठी अधिकाऱ्यांची रस्सीखेच

वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या भेटीगाठींना वेग; शहर अभियंता पदासाठी लॉबिंग तीव्र, नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता हे मुख्य आणि महत्त्वाचे पद तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रिक्त आहे. त्या पदावर वर्णी लागली म्हणून अनेक वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत आहेत. महापालिका पदाधिकार्‍यांसह खासदार, आमदार तसेच, मुंबईतील मंत्र्यांकडे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थिती ते पद आपल्यालाच मिळावे म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे. या रस्सीखेचात कोणत्या अधिकार्‍याला संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे.

महापालिकेचे शहर अभियंंता मकरंद निकम यांनी 28 फेब्रुवारी 2026 ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्तीचा विषय महापालिका निवडणुकीत खूपच गाजला. ते पद रिक्त झाल्यानंतर त्या पदावर महापालिका आस्थापनेवरील वरिष्ठ व अनुभवी अधिकारी नेमणे गरजेचे होते. मात्र, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनी त्या पदावर अधिकारी न नेमता, शहर अभियंत्यांकडे असलेल्या विविध विभागांचा कार्यभार तात्पुरता स्वरुपात महापालिकेच्या इतर अधिकार्‍यांकडे सोपवला आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे स्थापत्य विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे उद्यान व क्रीडा स्थापत्य विभाग आणि शहर दळणवळण विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे बांधकाम परवानगी विभागाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे.

अनेकांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटीगाठी

मकरंद निकम यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर नवीन शहर अभियंता कोण याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. मात्र, ते पद मिळावे म्हणून मुख्य अभियंत्यांसह सहशहर अभियंता पदाचे वरिष्ठ अधिकारी आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आयुक्तांसह महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच, खासदार, आमदारांकडे त्याबाबत विनवण्या करण्यात येत आहेत. काहींनी थेट मुंबई गाठत, नगर विकास विभागासह मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यासाठी आपला दावा सांगितला आहे. मी कसा पात्र, अनुभवी आणि अधिक वरिष्ठ हे पटवून दिले जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर केला जात आहे. या मोर्चेबांधणीत कोणाला यश मिळते आणि शहर अभियंता पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याची संधी मिळते, याची महापालिका वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

पालिकेतील इच्छुक निवृत्तीच्या उंबरठ्यावर

दरम्यान, इच्छुक असलेले बहुतांश वरिष्ठ अधिकारी वर्षभरात निवृत्त होणार आहेत. महापालिका सेवेतील कमी कालावधी शिल्लक असल्याने शहर अभियंता पदासाठी रस्सीखेच वाढली आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो, याकडे पदाधिकार्‍यांसह अधिकारी व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे. जर, वेळेत हे पद भरले गेले नाही तर, शासनस्तरावर त्या पदावर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी नेमला जाऊ शकतो. परिणामी, महापालिका आस्थापनेच्या अधिकार्‍यांची शहर अभियंंता पदाची संधी हुकू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT