PCMC Cancer Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Cancer Hospital: पिंपरी-चिंचवडमध्ये पहिले कॅन्सर रुग्णालय; थेरगावमध्ये 10 मजली इमारत

100 बेडची अत्याधुनिक सुविधा; 143 कोटींचा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य तसेच, गोरगरीब रुग्णांसाठी महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील नवीन रुग्णालयाशेजारील मोकळ्या जागेत कर्करोग (कॅन्सर) रुग्णालय उभारण्यात येत आहे. दहा मजली इमारतीमध्ये एकूण 100 बेड असणार असून, अद्ययावत अशी उपचार सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला नुकतीच वर्कऑर्डर देण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत इमारत बांधून, प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून डिजाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट (डीबीएफओटी) तत्त्वावर कॅन्सरचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. ते महापालिकेचे कॅन्सरचे पहिले रुग्णालय असणार आहे. वैद्यकीय विभागाच्या त्या प्रस्तावाला आयुक्तांनी 1 मार्च 2024 ला मान्यता दिली. त्यासाठी 12 मार्च 2024 ला निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. 11 नोव्हेंबर 2024 च्या निविदेत पात्र ठरलेल्या आपुलकी हेल्थकेअर प्रा. लि. या संस्थेला ते काम 30 वर्षांसाठी देण्यात आले. त्याला आयुक्तांनी 15 डिसेंबर 2025 ला मान्यता दिली. त्यानुसार, करारनामा करण्यात आला आहे. तसेच, कामाची वर्कऑर्डर त्या संस्थेला 30 जानेवारी 2026 ला देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे.

थेरगाव रुग्णालयाशेजारील 34 हजार 848 चौरस फूट जागेत रुग्णालयासाठी 10 मजली सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. ते काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेकडून व्हॅबिलिटी गॅप फंड म्हणून संस्थेला 60 कोटी 6 लाख रुपये देण्यात आले आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च 143 कोटी रुपये इतका आहे. उर्वरित खर्च संस्था स्वत: करणार आहे. संस्था इमारत बांधणार असून, इमारत तयार झाल्यानंतर रुग्णालयात रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सेवा सुरू केले जातील.

अत्याधुनिक वैद्यकीय उपचार

कॅन्सर रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. त्यामध्ये लिनियर एक्सिलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनरची सुविधाही रुग्णांना देण्यात येणार आहे. शहरातील कॅन्सर रुग्णांना तेथे अल्पदरात अत्याधुनिक उपचार सुविधा मिळतील. संबंधित संस्थेला नुकतीच वर्कऑर्डर देण्यात आली आहे. येत्या 2 वर्षांत रुग्णालयासाठी इमारत उभी राहील. शहरातील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम करण्यावर महापालिकेचा भर आहे, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

कॅन्सर रुग्णालयात मिळणार या सुविधा

शहरातील कॅन्सरवर नियंत्रण मिळवणे हे या रुग्णालयाचा हेतू आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॅन्सरवर विशेष उपचार सुविधा अल्पदरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना उपचार घेणे आवाक्यात येणार आहे. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सामान्य कॅन्सरच्या उपचारांव्यतिरिक्त, रुग्णालय समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहाय्यक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत. हे रुग्णालय स्तन, फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असणार आहे. या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचे दर महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजना तसेच, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील दराप्रमाणे असणार आहेत. त्यामुळे रुग्णांना अल्पदरात उपचार उपलब्ध होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT