Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC 60 Crore Scam: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ६० कोटींच्या बोगस उपसूचना घोटाळ्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

ठेकेदारांनी केलेल्या कामांचा दर्जा तपासल्यानंतरच मंजुरी; स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांचा दावा, तर विरोधकांकडून अंग काढून घेतल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: बोगस उपसूचनेद्वारे तब्बल ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांच्या आर्थिक घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात चांगला गाजला होता. त्या रक्कमेच्या बिलाच्या वर्गीकरणास मान्यता देण्याचा प्रशासनाकडून पुन्हा सादर करण्यात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या (दि.२५) सभेत अखेर, दप्तरी दाखल करण्यात आला. ठेकेदारांनी ती काम पूर्ण केले की नाही, त्याचा दर्जा कसा होता, त्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले आहे.

सभेसमोर वरील प्रस्ताव मंजुरीसाठी होता. महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पास महापालिका सभेने २४ मार्च २०२६ ला मान्यता दिली. त्यानंतर नगरसेवकांनी दिलेल्या वेगवेगळ्या १७ पैकी १४ बोगस उपसूचना देऊन मुख्य लेखा व वित्त विभागाने परस्पर मंजूर करून, तब्बल ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची बिले मर्जीतील ठेकेदारांना अदा करण्यात आली. हा प्रकार ३० मार्च २०२६ ला घडला होता. त्या प्रकार मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रवीण जैन यांनी केल्या असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. त्यानंतर आयुक्तांनी जैन यांना १० एप्रिलला तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच, अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती.

समितीने १२ जूनला चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला. त्यात १४ उपसूचना बोगस असल्याचे आढळून आले. त्याद्वारे एकूण ६०कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची बिले परस्पर लेखा व वित्त विभागाकडून अदा करण्यात आली होती. त्यासाठी स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली नव्हती. तो चौकशी अहवाल कारवाईसाठी आयुक्तांनी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे पाठवला. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची नवी मुंबई महापालिकेत बदली झाली. तसेच, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच, कोणावरही कारवाई झालेली नाही.

असे असताना प्रशासनाने नगरसेवकांच्या १४ बोगस उपसूचनेद्वारे ठेकेदारांना अदा करण्यात आलेल्या ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची तरतूदीनुसार अर्थसंकल्पात झालेल्या वाढ व घट करण्यास मान्यता देऊन महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने १६ सप्टेंबरच्या सभेत तहकूब केला होता. तो प्रस्ताव पुन्हा समितीसमोर ठेवण्यात आल्याने दप्तरी दाखल करण्यात आला आहे.

त्या संदर्भात अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले की, निमयबाह्यपणे ६० कोटी १८ लाख रुपयांची बिले ठेकेदारांना देण्यात आली. त्या ठेकेदारांनी काम व्यवस्थित केलेले आहे का, त्याचा दर्जा योग्य आहे का, पाच महिने उलटूनही त्या संदर्भातील अहवाल प्रशासनाने दिलेला नाही. ती कामे खरोखर झाली का नाही, हे समजले पाहिजे. अहवाल दिल्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. दप्तरी दाखल केल्याने तो विषय सर्वसाधारण सभेसमोर जाऊ शकतो. ती सभा सर्वोच्च असल्याने त्यावर निर्णय घेईल.

अध्यक्षांनी अंग काढून घेतल्याचा विरोधकांचा आरोप

बोगस उपसूचना देऊन मर्जीतील ठेकेदारांना तब्बल ६० कोटी १८ लाखांची बिले अदा करण्यात आल्याचा घोटाळा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी आयुक्तांकडे तक्रार करून बाहेर काढला. ती कामे झाले की नाही याचा अहवाल अद्याप आल नाही. त्या प्रकरणी कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. काही नगरसेवकांच्या खोट्या सह्या असल्याचे तक्रारी आहेत. त्याबाबतही काही कारवाई झाली नाही. त्या घोट्याळात संबंधित विभागप्रमुखही सामील आहेत. असे असताना, तो प्रस्ताव दप्तरी दाखल करून, अध्यक्ष बारणे हे आपले अंग काढून घेत आहेत. आता तो विषय सर्वसाधारण सभेसमोर जाणार आहे, असा आरोप शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी केला. तसेच, इंटरनेटचे बिल ठेकेदाराने भरले नसल्याने महापालिकेची डीएमएस प्रणाली गेल्या चार महिन्यांपासून ठप्प असल्याचे दैनंदिन कामकाजाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मी अंग काढून घेतलेले नसल्याचा अध्यक्षांचा दावा

या प्रकरणाची तक्रार मी स्वत: केली आहे. स्थायीस समिती व सर्वसाधारण सभेला डावलून परस्पर ती बिले देण्यात आली. त्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांच्यावर कारवाई झाली. दिलेल्या बिलांनुसार प्रत्यक्ष काम झाले की नाही, याचा अहवाल संबंधित विभागाने सादर केल्यानंतर त्या विषयाला मंजुरी दिली जाईल. या प्रकरणातून मी अंग काढून घेतलेले नाही, असा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केला आहे. डीएसएम प्रणाली प्रशासन काळात आणण्यात आली आहे. त्या संदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT