Women Skill Development Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Women Skill Development: पिंपरी-चिंचवडमध्ये १६ हजार महिलांना रोजगार प्रशिक्षण; ५७ कौशल्य अभ्यासक्रमांची संधी

डिजिटल मार्केटिंगपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत प्रशिक्षण; खासगी संस्थेचा खर्च महापालिका उचलणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून महिलांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. वर्षभरात एकूण १६ हजार महिला व तरुणींना वेगवेगळ्या ५७ प्रकारचे प्रशिक्षण खासगी संस्थेमार्फत दिले जाणार आहे. त्यासाठी एकाला किमान ११ हजार २५ रुपये तर कमाल ३२ हजार ११९ रुपये शुल्क आहे. ते शुल्क महापालिका त्या संस्थेला देणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चास तसेच, विविध कामांच्या खर्चाना स्थायी समितीने बुधवारी (दि. १८) झालेल्या सभेत मंजुरी दिली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या वेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगर सचिव उल्हास जगताप, समितीचे सदस्य तसेच, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. समाज विकास विभागाकडून महिला सक्षमीकरण व सबलीकरण योजनेंतर्गत शहरातील महिला व मुलींना वस्तीपातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले जाते.

त्यासाठी ५७ विविध विषयांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या खासगी संस्थेमार्फत एका वर्षाच्या कालावधीत दिले जाणार आहे. त्या खर्चास समितीने मान्यता दिली. यामध्ये अकाउंट्स, फॅशन डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्युटी व वेलनेस, फूड प्रोसेसिंग, माहिती तंत्रज्ञान, डेटा ॲनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, केटरिंग तसेच पारंपरिक कला आणि सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये सेवाशुल्क बिलांचे वाटप व नागरिकांची माहिती मोबाईल ॲपद्वारे अद्ययावत करण्याचे काम महिला बचतगटांमार्फत करण्यात येणार आहे. प्रत्येक बिलासाठी २५ रूपये शुल्क दिले जाणार आहे.

दिघी-आळंदी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटर, सबवे व उड्डाणपूल, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल आणि नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावरील विविध स्ट्रक्चर्सच्या रेलिंग, स्ट्रॉमवॉटर लाईन व इतर स्थापत्यविषयक दुरुस्ती करणे, रस्ते दुभाजकांची देखभाल व सुशोभीकरण करणे, एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दैनंदिन साफसफाई तसेच, नेहरूनगर येथील नवीन न्यायालय परिसरातील स्वच्छतेसाठी कर्मचारी पुरविण्याच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विविध विभागांसाठी कॉटरी मशीन खरेदी, रुग्णालयातील रंगरंगोटी आणि भोसरी रुग्णालयातील स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात राष्ट्रध्वज फडकविणे, त्याचे संचलन व देखभाल तसेच संबंधित यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामास मान्यता देण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळाल्याने आयुक्तांचा सत्कार

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या हस्ते आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व समितीचे सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT