उर्से मावळ: पवन मावळमध्ये सध्या मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण आणि पडताळणी मोहिमेला वेग आला असून, या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, शाळा नुकत्याच नियमितपणे सुरू झालेल्या असताना अध्यापनाचे काम आणि त्याच वेळी मतदारयादी पडताळणीची जबाबदारी यामुळे शिक्षकांवर दुहेरी ताण निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही त्याचा परिणाम होत असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
शिक्षण विभाग आणि निवडणूक प्रशासनाच्या सूचनांनुसार नियुक्त शिक्षकांना शाळेचे नियमित कामकाज पूर्ण करून दुपारनंतर तसेच सुटीच्या दिवशी मतदारयादी पडताळणीचे काम करावे लागत आहे. या कामात प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची खातरजमा करणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि नोंदी अद्ययावत करणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या पावसाळी हंगाम सुरू असून, ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक सकाळीच शेतीची कामे किंवा रोजंदारीसाठी घराबाहेर पडत असल्याने शिक्षकांना संबंधित मतदार घरी भेटत नाहीत.
शैक्षणिक कामकाजाला प्राधान्य देण्याची पालकांची मागणी
अनेक गावांमध्ये दुपारच्या वेळी घरात केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलेच आढळतात. त्यामुळे आवश्यक माहिती मिळत नसल्याने शिक्षकांना त्याच घराकडे दोन ते तीन वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. वारंवार भेटी देऊनही पडताळणी पूर्ण होत नसल्याने कामाचा ताण वाढत आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचेही मोठे आव्हान शिक्षकांसमोर उभे आहे. विशेषतः शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांची वर्गात उपस्थिती आवश्यक असते. अशा काळात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या कामात शिक्षक गुंतल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांमधूनही याबाबत चिंता व्यक्त होत असून, शैक्षणिक कामकाजाला प्राधान्य देण्याची मागणी पुढे येत आहे.
शिक्षक मानसिक तणावात
शिक्षकांना एका बाजूला विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी तर, दुसऱ्या बाजूला बीएलओ म्हणून ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे दडपण अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. पाऊस, चिखल आणि दुर्गम भागातील प्रवास यामुळे या कामात अधिकच अडचणी निर्माण होत आहेत. वेळेअभावी मानसिक आणि शारीरिक ताण वाढत असल्याचे अनेक शिक्षक सांगत आहेत. शैक्षणिक कामकाज आणि निवडणूक प्रक्रिया या दोन्ही महत्त्वाच्या असल्या तरी दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडताना शिक्षकांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, यासाठी बीएलओच्या कामाचे योग्य नियोजन करावे किंवा पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
एसआयआर काम सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिक आपल्या वेळेनुसार वर्गात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही. सकाळी साडेसात ते साडेबारापर्यंत शाळा आणि यानंतर एसआयआरचे काम दुपारी करण्यास सांगितले आहे. यामुळे मोठी कसरत करावी लागते. आम्हाला आराम, कौटुंबिक जीवन नाही का? शनिवार आणि रविवार ही पूर्ण दिवसभर काम सुरू आहे.श्रद्धा बागुल, अनिता दानवे, उपशिक्षिका, उर्से जिल्हा परिषद शाळा