उर्से मावळ: यंदाचा मान्सून दिलासा घेऊन येण्याऐवजी पवनमावळ परिसरातील शेतकर्यांसाठी संकटांची मालिका घेऊन आला आहे. मेअखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीस आवश्यक वापसा मिळालाच नाही आणि त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसामुळे भात रोपवाटिकांपासून ते खरीप हंगामातील इतर पिकांच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. परिणामी, शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.
लावणीप्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता
याविषयी सहायक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले, की भाताच्या रोपांसाठी जमीन ओली लागते, पण ती दलदलीची नसावी. सध्याच्या हवामानामुळे रोपवाटिका तयार करण्यास वेळ लागत आहे. कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले, की जमिनीत आवश्यक ती आर्द्रता टिकण्याऐवजी पाण्याचा साठा दलदल निर्माण करतो. (Latest Pimpri News)
त्यामुळे रोपे तयार करण्याची वेळ उलटून गेली आहे. याचा थेट परिणाम मुख्य भातलागवडीच्या वेळापत्रकावर होणार आहे. रोपवाटिका वेळेवर न झाल्याने लावणीप्रक्रिया लांबणीवर गेली आहे. या विलंबामुळे भाताचे पीकचक्र कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती
याशिवाय, पाणथळ जमिनीत किडी व रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही शेतकर्यांमध्ये आहे. करपा, पानांवरील डाग, बुरशीजन्य रोग आणि कीटकजन्य हल्ले वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाच्या विस्कळीततेमुळे सर्वच पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
पावसाने रोपे घ्यायची वेळ गाठली, पण जमिनी लागवडीसाठी तयार नाहीत. आता रोपे तयार झाली तरी त्याची लागवड कधी करायची, याचा ठावठिकाणा नाही, असे प्रश्न सध्या पवनमावळातील शेतकर्यांंना पडले आहेत. कृषी विभागाने तातडीने यावर उपाययोजना करून शेतकर्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याची मागणी शेतकर्र्यांकडून केली जात आहे.
पावसामुळे जमीन चिखलमय
सामान्यतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात रोपवाटिका तयार करण्याचे काम वेग घेत असते. मात्र, यंदा या काळातच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक खाचरे पाण्याने भरून गेली आहेत. परिणामी, जमीन भुसभुशीत होण्याऐवजी चिखलमय व दलदलीसारखी झाली आहे. वापसा येण्याची वाट पाहणार्या शेतकर्यांच्या आशा सततच्या पावसाने पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत.