

पिंपरी: सतत काम करीत राहा. आपण केलेल्या कामाचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही. लोकांना सर्व माहीत आहे. त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय त्यांना घेऊ द्या. फार चिंता करू नका, असे सांगत ‘ये पब्लिक हैं सब जानती हैं’ असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. भोसरी येथे मंगळवारी (दि. 17) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी-चिंचवडचा विकास केवळ अजित पवारांनी केला. सन 2017 नंतर महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे जाहीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (Latest Pimpri News)
तो धागा पकडून भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी कार्यक्रमात जाहीर नाराजी व्यक्त केली. तो धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी श्रेयाची अपेक्षा न ठेवता काम करीत राहण्याचा सबुरीचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. आपण केलेल्या कामांचे श्रेय कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. शहरात खेळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुलांना खेळास प्रोत्साहन मिळेल, अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
महापालिकेच्या विकासकामांची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली. तर, ज्येष्ठांच्या मदतीसाठी असलेल्या ज्येष्ठानुबंध अॅप व ट्रॅफिक बडी व्हॉट्स अॅप प्रणालीची माहिती पोलिस आयुक्त चौबे यांनी दिली. त्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आभार मानले.
चर्होलीचा डीपी स्कीम रद्द करण्याचे आयुक्तांना आदेश
लोकांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासाचे नियोजन करा. लोकांचा विरोध असल्याने चर्होली येथील टीपी स्कीम रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्त शेखर सिंह यांना कार्यक्रमातच दिले. ते म्हणाले की, जे करायचे आहे ते लोकांसाठी करा. भविष्याचे नियोजन करताना लोकांना विश्वासात घ्या. झपाट्याने वाढत असलेल्या शहराला काय देणार, हे ठरवा. शहराचे खेडेगाव करणार की काँक्रीटचे जंगल, हे भविष्यात विचारले जाईल, हे लक्षात ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
या कामाचे उद्घाटन व भूमिपूजन
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे संतसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. त्यात एकूण 25 शिल्पे आहेत. चिखली येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संतपीठातील प्रेक्षागृह व कलादालनाचे लोकार्पण करण्यात आले. शहरात 1 लाख 50 हजार देशी वृक्षलागवड मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
किवळे येथील मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्कीमपर्यंत एक्स्प्रेस हायवेलगतचा 12 मीटर डीपी सर्व्हिस रस्ता, बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्स्प्रेस हायवेपर्यंतचा सिम्बायोसिस महाविद्यालयामागील 18 मीटर डीपी रस्ता आणि विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौकपर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइनद्वारे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली.
सेंट मदर टेरेसा उड्डाण पुलावरून चिंचवड बाजूकडे उतरण्यास व चढण्यास बांधण्यात आलेल्या लूपचे लोकार्पण करण्यात आले. पवना नदीवर चिंचवडगाव येथील बटरफ्लाय पुलाचे लोकार्पण करण्यात आले. चिखलीत 12 एमएलडी व पिंपळे निलखमधील 15 एमएलडी क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. पिंपळे सौदागर येथील क्लायबिंग वॉलचे लोकार्पण करण्यात आले.
दिघी व भोसरी येथील शाळा इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. चर्होलीतील चोविसावाडी येथील अग्निशमन केंद्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. थेरगाव व भोसरी रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग लोकार्पण करण्यात आले. भोसरीतील सखूबाई गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळ इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ज्येष्ठानुबंध अॅप व ट्रॅफिक बडी व्हॉट्सअॅप प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.
पैलवान असल्याने थेट अंगावर घेतो
कार्यक्रमात निविदा कधी प्रसिद्धी झाल्याची माहितीही महापालिकेने द्यावी. त्यामुळे तो प्रकल्प कधी तयार झाला, हे स्पष्ट होईल. बावचळलेले विरोधक आम्हीच काम केले, असे खोटे सांगत घंटा वाजवत आहेत. डीपी आणि टीपीबाबत शहरातील स्वयंघोषित तज्ज्ञमंडळी अफवा पसरवत आहेत.
सन 2017 नंतर महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. पूर्वी शहराबाहेरचे लोक महापौर व स्थायी समिती चेअरमन ठरवत होते. भाजप काळापासून तो प्रकार बंद झाला आहे. मी पैलवान असून, थेट अंगावर घेतो, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेतात्यांना दिला.