पिंपरी: मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरण शुक्रवार (दि. २४) १०० टक्के भरले. पावसाची संततधार आणि धरणात वाढत असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन धरणातून शुक्रवार सकाळपासून ८०० क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तर तो टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढत सायंकाळी सातला एकूण ९००० क्युसेकपर्यंत केला जाणार आहे; पात्र फुगल्याने पवना नदीस पूर आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे तहान भागविणारे पवना धरण अखेर, शुक्रवारी १०० टक्के भरले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच, घाटमाथ्यावर पाऊस पडत असल्याने धरणात पाणीसाठा वाढतच आहे. पवना धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी नऊपासून पवना नदीपात्रात विद्युतगृहद्वारे ८०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.
धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात आला. सायंकाळी सातपासून विद्युतगृहातून १४०० क्युसेकने आणि सांडव्यातून ४२०० क्युसेक असे एकूण ५६०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्री आठला एकूण विसर्ग ७००० क्युसेक करण्यात आला. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विसर्ग ९००० क्युसेक इतका केला जाणार आहे.
त्यामुळे पवना नदीचे पात्र फुगले असून, ती दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकवस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील २४ तासांत एकूण ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे ओढे, नाले व नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील साहित्य, शेतीचे अवजारे, कृषी पंप, जनावरे नदीपात्रासापसून सुरक्षित ठिकाणी इतरत्र हटवण्यात यावेत. तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात २४. ४० किलोमीटर लांबीचे पवनेचे पात्र
पिंपरी-चिंचवड शहरातून मध्य भागातून पवना नदी २४. ४० किलोमीटर अंतर वाहते. किवळे ते सांगवी असे दोन्ही बाजूचे पात्र शहरात आहे. सांगवी येथे पवनेचा मुळा नदीशी संगम होतो. नदीकाठची घरे, लोकवस्ती, हाऊसिंग सोसायटी आदी भागांत पुराचे पाणी शिरते.
शहरातील १५ टक्के पाणीकपात रद्द होणार ?
पिंपरी-चिंचवड शहरात २० जूनपासून १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पवना धरण शुक्रवारी १०० टक्के भरले आहे. त्यामुळे महिन्याभरापासून सुरू असलेली पाणीकपात रद्द केली जाणार का, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. त्यासंदर्भात जलसंपदा विभागाशी चर्चा सुरू आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.