Pavana Dam Pudhari
पिंपरी चिंचवड

Pavana Dam Floating Solar: पवना धरणावर फ्लोटिंग सोलर पॅनेल; महापालिकेचा वीजनिर्मितीचा मोठा प्लॅन

डीपीआरसाठी निधीची तरतूद; १५ ऑक्टोबरच्या महासभेत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात आले आहेत. त्याप्रमाणे आता पवना धरणावर फ्लोटिंग सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहेत. त्यातून वीजनिर्मितीचे महापालिकेचे नियोजन आहे.

शहरभरात महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय, शाळा, रुग्णालय, महापालिका भवन, गोदाम, क्रीडासंकुल, नाट्यगृह, पाणी शुद्धीकरण केंद्र अशा वेगवेगळ्या 264 इमारती आहेत. यापैकी 95 इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. इतर 21 इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

उर्वरित 148 इमारतींवर यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात सुका कचरा जाळून 14 मेगा वॅट वीजनिर्मिती केली जात आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात महापालिकेने वीजबिलापोटी 158 कोटी रुपये महावितरण कंपनीला दिले आहेत. तसेच, वीजनिर्मितीसह वीजबचतीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर शहराची तहान भागविणार्‍या मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणावर फ्लोटींग सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्या कामाचा डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात त्या कामाचा समावेश करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रीय कार्यालय, क्रीडासंकुल, नाट्यगृह, शाळा व मनपाच्या सर्व इमारतींवर सोलर पॅनल बसवणे या कामासाठी 37 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

त्या लेखाशीर्षावरील 1 लाख रुपयाची तरतूद अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीजनिर्मिती करणे या लेखाशीर्षात वाढवण्यात आली आहे. त्या लेखाशीर्षातील मनपाद्वारे पवना धरणावर प्लोटिंग सोलर बसविण्याकरिता डीपीआर तयार करणे या कामासाठी तो निधी वापरला जाणार आहे. तसेच, 1 कोटी रुपयाच्या तरतुदीस प्रशासकीय मान्यता देणे आणि तरतुदीत वाढ-घट करण्याच्या प्रस्ताव येत्या 15 ऑक्टोबरला होणार्‍या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यास पवना धरणात प्लोटिंग सोलर पॅनल बसविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT