Crop Loss Pudhari
पिंपरी चिंचवड

Pavan Maval Soybean Pest: पवन मावळात सोयाबीनवर किडींचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा

पाने खाणारी अळी, चक्री भुंगा अन् खोड माशीचा धोका; नियमित पीक पाहणीसह एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

उर्से मावळ: पवन मावळ तालुक्यातील सोयाबीन पीक सध्या वाढीच्या तसेच अनेक ठिकाणी फुलोऱ्याच्या संवेदनशील अवस्थेत असून, वातावरणातील आर्द्रतेमुळे पाने खाणारी अळी, चक्री भुंगा आणि खोड माशी या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या अवस्थेत किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित पीक पाहणी करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, पाने खाणारी अळी पानांचा हिरवा भाग कुरतडून छिद्रे पाडते तसेच फुलोऱ्याच्या अवस्थेत कळ्या व फुलांचे नुकसान करते. चक्री भुंगा मुख्य खोड किंवा फांदीवर चक्राकार काप करून त्यामध्ये अंडी घालतो. त्यामुळे कापाच्या वरील भाग सुकून तुटून पडतो. खोड माशी पानांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेली अळी पानाच्या शिरेतून खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते.

त्यामुळे वनस्पतीचे पोषण थांबून रोपे वाळण्याचा धोका निर्माण होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी (३ मिली), फ्ल्युबेंडियामाईड ३९.३५ टक्के एससी (५ मिली), थायमेथॉक्सम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सायहेलोथ्रिन ९.५ टक्के झेडसी (५ मिली), इंडोक्साकार्ब १४.५ टक्के एससी (८ मिली) किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी (२० मिली) यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होवू शकतो, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

कामगंध सापळे लावण्याचे आवाहन

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतिएकरी २० ते २५ टी आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच, पिवळे व निळे चिकट सापळे, तसेच पाने खाणाऱ्या अळीच्या पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रतिएकरी पाच कामगंध सापळे लावावेत. चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसताच बाधित फांद्या किंवा झाडे काढून जमिनीत पुरावीत, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. नियमित निरीक्षण आणि वेळेवर उपाययोजना केल्यास सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान टाळता येईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT