Crop Loss Pudhari
पिंपरी चिंचवड

Pavan Maval Crop Disease: पवन मावळात पिकांवर दुहेरी संकट; मररोगासह लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला

भात, सोयाबीन, मक्याला फटका; दमट-ढगाळ वातावरणामुळे रोगाचा फैलाव, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती

पुढारी वृत्तसेवा

उर्से मावळ: पवन मावळ परिसरातील अनेक गावांमध्ये भात, सोयाबीन आणि मका पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेला पाऊस, त्यानंतर आर्द्रता आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे रोगाच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी झाडे अचानक कोमेजणे, पाने पिवळी पडणे तसेच काही ठिकाणी संपूर्ण झाड सुकून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

उत्पादनाला फटका बसण्याची भीती

कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मररोग हा प्रामुख्याने बुरशीजन्य रोग असून, तो मुळांद्वारे पिकामध्ये प्रवेश करतो. रोगग्रस्त झाडांमध्ये अन्नद्रव्ये व पाण्याचा पुरवठा खंडित होत असल्याने झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. सुरुवातीला काही झाडांमध्ये रोगाची लक्षणे दिसून येतात. मात्र, वेळीच नियंत्रण न आणल्यास हा रोग संपूर्ण शेतात वेगाने पसरू शकतो. सध्या मका पीकवाढीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगग्रस्त झाडे आढळून येताच ती त्वरित उपटून नष्ट करावीत, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

मावा, तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने कोमेजली

परिसरातील कोवळ्या मका पिकांवर सध्या लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पिकांची वाढ खुंटली

यंदा जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, मागील काही दिवसांतील उष्ण व दमट वातावरणात लष्करी अळीने डोके वर काढले आहे. ही अळी पिकाच्या पोंग्यात आणि झाडाच्या मध्यभागी लपून राहून कोवळी पाने कुरतडत आहे, ज्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे.

उत्पादन खर्च वाढला

परिसरातील शेतकऱ्र्यांनी सांगितले, की आम्ही विविध औषधांची फवारणी केली, तरीही अळी पूर्णपणे नष्ट होत नाही. आर्थिक खर्च वाढतोय पण पीक वाचत नाहीये. कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. अळी पोंग्यात आढळल्यास क्लोरोपायरीफॉस १८.५ एससी किंवा इमामेक्टिन बेन्झोएटची फवारणी करावी. अळीचे प्रमाण जास्त असल्यास २० लिटर पाण्यात १४ ग्रॅम औषध घ्यावे. तसेच, निंबोळी अर्काचा वापर केल्यास अळीच्या नियंत्रणास मदत होते, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT