लोणावळा: लोणावळा शहरामध्ये एका तरुणीवर कार मध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार आज शनिवारी (26 जुलै) उघडकीस आला आहे. काल शुक्रवारी (25 जुलै) रात्री नऊ ते शनिवारी पहाटे दरम्यान ही धक्कादायक घटना लोणावळा शहरामध्ये घडली आहे.
कार मध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी गाडी थांबवत तीन नराधमांनी सदर तरुणीवर बलात्कार केला असल्याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली. (Latest Pimpri News)
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणीही तुंगार्ली भागातील नारायणी धाम मंदिर परिसरातील रस्त्याने जात असताना एका कार मध्ये तिला तोंड दाबून जबरदस्तीने बसवण्यात आले.
त्यानंतर तिचे हात बांधत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या सर्व प्रकारानंतर सदर मुलीला नांगरगाव येथील एका रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करत दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारा तासात या प्रकरणातील एक आरोपी निष्पन्न करत त्याला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामाघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.